बांदा (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील बांदा येथे काही दारूड्या गुंडांनी केलेल्या गोळीबारात एकाच कुटुंबातील दोन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत हे हल्लेखोर परिसरातील एका महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न करत असताना बाबेरू कोतवाली परिसरात ही घटना घडली. तिथे दारू पिऊन आलेल्या काही गुंडांनी हरिराम नावाच्या व्यक्तीच्या घरात जबरदस्तीने घुसून त्याच्या पत्नीचा छळ करण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबीयांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गोळीबार केल्याने दोन जण ठार झाले. शारदा यादव (वय 42 वर्षे) आणि छोटा यादव ( 52 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. अवधेश यादव (22 वर्षे) आणि करण यादव (25 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात मोठीच दहशत निर्माण झाली आहे.