नवी दिल्ली : कुतुबमिनारचा वाद आणखी जोर पकडताना दिसत आहे. मंगळवारी हिंदू संघटनांशी संबंधित लोक हनुमान चालिसाचे पठण करत असताना कुतुबमिनारवर पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेतलं आहे.
लोकांनी कुतुबमिनारबाहेर हनुमान चालिसाचेही पठण केले असून कुतुबमिनार हा विष्णूस्तंभ असल्याचा दावा संयुक्त हिंदू आघाडीने केला आहे. भगवे झेंडे घेऊन काही लोक हनुमान चालिसाचे पठण करत कुतुबमिनारकडे जात होते. मात्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. तसेच कुतुबमिनारकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्सही लावले होते.
कुतुबमिनार येथील हनुमान चालिसाचे पठण रोखण्यासाठी पोलिसांनी युनायटेड हिंदू फ्रंटचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष जयभगवान गोयल यांना मंगळवारी सकाळी नजरकैदेत ठेवले होते.
दरम्यान, कुतुबमिनार हा साक्षात विष्णुस्तंभ आहे. 27 जैन आणि हिंदू मंदिरे पाडून हा मिनार उभारण्यात आला. या संकुलातील जैन आणि हिंदू देवतांच्या मूर्तींचा जीर्णोद्धार करून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात यावी आणि हिंदूंना येथे पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी युनायटेड हिंदू फ्रंटने केली आहे.