अकोले(प्रतिनिधी) – केद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी आज शुक्रवारी अकोलेत येत असून, त्यांचेहस्ते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा 81 वा अभीष्टचिंतन सोहळा व विकासाची 50 वर्षपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम विठ्ठल लॅान्स, अकोले येथे होत आहे. उड्डाणपूल व रस्त्यांचे जाळे बांधणारा मंत्री अशी ओळख असलेले गडकरी तोलारखिंडचा प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना असून, अकोलेसाठी आणखीन काय घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.
अकोले तालुक्यातील तोलारखिंड फोडून त्यामार्गे रस्ता होऊन मुंबई जवळ व्हावी, ही माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यांनी अनेकदा भाषणातून बोलूनही दाखवले आहे. तालुक्यात विकास करताना अनेक प्रश्न मार्गी लावली. आता मला फक्त तोलारखिंड फोडायची इच्छा आहे. केंद्रातील विकासकामांचे मंत्री म्हणून ओळख असलेले नितीन गडकरी अकोलेत अभीष्टचिंतन सोहळ्यात येत असून, ते या सोहळ्यातून तोलारखिंडचा प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली.यावेळी आमदार, खासदार यांच्यासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.