नवी दिल्ली : डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका महिलेचा व तिच्या जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. आधार कार्ड किंवा प्रसूती कार्ड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करण्यास नकार दिला ज्यामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे.
कस्तुरी असे मृत महिलेचे नाव असल्याचे महिलेच्या शेजाऱ्यांनी सांगितले. भारतीनगर येथील एका घरात ती दुसऱ्या मुलीसोबत राहत होती. महिलेचा पती तिच्या सोबत राहत नव्हता. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी महिलेला प्रसूती वेदना होत असताना शेजाऱ्यांनी तिला तुमाकुरू जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, आधार आणि प्रसूती कार्ड न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाने महिलेला दाखल करण्यास नकार देत तिला घरी पाठवले.
शेजाऱ्यांनी सांगितले की, घरी परतल्यानंतर कस्तुरीच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, दुसऱ्या मुलाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर काही वेळातच तिच्या पहिल्या मुलाचाही मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी सांगितले, कस्तुरीला सहा वर्षांची मुलगीही आहे.
ही घटना उघडकीस येताच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करत आहेत. तर दुसरीकडे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरला निलंबित करण्याची शिफारस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मंजुनाथ यांनी केली आज. तसेच हे कर्तव्याचे उल्लंघन आहे, मी निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही, त्यामुळे डॉक्टरांच्या निलंबनाची शिफारस तुमाकुरू जिल्ह्याच्या उपायुक्तांकडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.