पुणे – महापालिकेच्या विकासकामांमधील निविदा प्रक्रियांमधील हस्तक्षेप आता हद्दपार होण्याची चिन्हे आहेत. निविदांसंदर्भात सर्व काम करण्यासाठी महापालिकेकडून “इंटेलिजन्ट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारेच आता निविदांचे “डॉकेट’ तयार करण्यास त्याला मान्यताही दिली जाणार आहे. या “आयडब्लूएमएस’ प्रणालीच्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यास मान्यता दिली आहे. सर्व विभाग प्रमुखांसह, संबधित अभियंत्यांना या ऑनलाइन प्रणालीद्वारेच निविदांचे कामकाज करावे लागणार आहे.
प्रक्रिया ऑनलाइन होणार असल्याने प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित होणार
महानगरपालिकेमार्फत अंदाजपत्रकिय तरतुदी नुसार विविध विभागांमार्फत प्रकल्पीय, भांडवलीय आणि महसुली कामे निविदा प्रक्रियेतून केली जातात. त्यासाठी, कामांचे पूर्वगणक पत्रक (पु.ग.प.), जी.आय.एस. मॅपिंग, प्रशासकीय मान्यता, लॉकिंग, तांत्रिक मान्यता, डीटीपी, निविदा जाहिरात, ऑडिट व दक्षता विभागाकरिता तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट, निविदा मान्यतेचे डॉकेट, कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि मोजमापक पुस्तके (एम.बी.) ही कामे संबंधित अभियंत्यांकडून कागदोपत्री केली जात होती.
त्यामुळे, अनेकदा या कामांमध्ये गैरप्रकार करत चुकीची माहिती देऊन काम करणे, कामाच्या ठिकाणात बदल करणे, पुगपमध्ये परस्पर बदल करणे, अटी-शर्थी बदलणे, एकाच प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळ्या विभागांनी वेगवेगळे दर लावणे असे प्रकार घडत होते. मात्र, त्यासाठी आता स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केल्याने निविदांमधील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. तसेच, ही प्रक्रिया ऑनलाइन असल्याने प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित होणार आहे.