नांदेड – शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या व्हिडिओवरून आणि नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले,’एका मस्तवाल गद्दार खासदाराने डीनला संडास साफ करायला लावले. ते डीन आदिवासी आहेत असं ते म्हणतात. मी कधीच जातपात पाहिली नाही. मी सर्वांना एकाच न्यायाने वागवलं आहे. मात्र, डीनला संडास साफ करायला लावल्यानंतर त्या गद्दारावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून डीनला धमकावण्यासाठी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे का?” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
तत्पूर्वी, हेमंत पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केले आहे आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे. मी अधिष्ठातांना म्हटले की, 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण शौचालय साफ करू. मी स्वत:हा पाणी टाकून शौचालय साफ केलं.’ असं म्हणत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.