Uddhav Thackeray : अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. त्यासाठी देशभरातील राम भक्तांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या उद्घाटन समारंभाला जाणार का? या प्रश्नाचे उत्तर आज त्यांनी स्वतः दिले आहे.
याविषयी बोलताना, “बाबरी पाडल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी अनेक संघर्ष करावा लागला. आम्ही 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता. राम आमचासुद्धा आहे, असे त्यांनी सांगितले होते.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी,”आज 6 जानेवारी माँ ची जयंती आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी आम्ही अभिवादन करण्यासाठी येत असतो. आजही आम्ही अभिवादन केले. 23 जानेवारीला हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे.
यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचे शिबीर होणार आहे. त्याच दिवशी रात्री अनंत कानेरे मैदान गोल्फक्लब येथे शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्यादिवशी नाशकात गोदावरी नदीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग येऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
अयोध्येमध्ये रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे ही उद्घाटन करण्यात आले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या विभागातून किती प्रतिष्ठित व्यक्ती आणि संत निमंत्रित आहे.