मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता तब्बल आठ महिने पूर्ण होताहेत. सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे असं वाटत असताना अद्याप निकाल येणं बाकी आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यात ठीक ठिकाणी सभा देखील घेतल्या. यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून कोकणात जाहीर सभा घेणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट शिंदे गटात सामील झालेल्या रामदास कदम यांच्या होम ग्राउंडवर सभा घेणार आहेत. 5 मार्चला ठाकरे रत्नागिरी दौरा करणार आहेत यादरम्यान सायंकाळी 5 वाजता ठाकरेंची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे.
यावेळी ठाकरे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच नव्या कार्यकर्त्यांसह आणि पदाधिकाऱ्यांसह ठाकरे पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सभेला विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे, चंद्रकांत खैरे यांच्यासह प्रमुख नेते हजेरी लावणार आहेत. तसेच सभेदरम्यान काही स्थानिक नवीन चेहऱ्याचा पक्षप्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
पक्ष फुटीनंतर आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष केंद्रित केले आहे. कोकणातील उदय सामंत आणि आणि योगेश कदम हे शिंदे गटात दाखल झाले आहेत. अशात ठाकरे स्वतः कोकणात येऊन या नेत्यांबाबत काय भाष्य करणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.