नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमधले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून रान पेटवायला सुरुवात केली आहे. याच घडामोडीत आणखी एक घटना घडली आहे ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आज सकाळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्या एका ट्वीटमुळे राजकीय तर्क वितर्क लढवले जात आहेत. कारण त्यांच्या ट्वीटमध्ये थेट शरद पवारांच्या भेटीचा संदर्भ उदयराजे यांनी दिला आहे.
आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट.@PawarSpeaks pic.twitter.com/eGpFl3MRIK
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 15, 2021
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपाशी हातमिळवणी केल्यापासून शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांआधीच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला दिलेली सोडचिठ्ठी आणि त्यानंतर साताऱ्यातून त्यांचा झालेला पराभव या गोष्टींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये कमालीचा विरोध दिसून आला. मात्र, तरीदेखील उदयनराजे भोसले शरद पवारांचा उल्लेख आदराने आणि सन्मानानेच घेताना दिसून आले.
गेल्या दोन वर्षांत उदयनराजे यांनी शरद पवारांवर थेट आणि तीव्र टीका करणं टाळलं आहे. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या भेटीमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. उदयनराजे भोसले यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून या चर्चेला तोंड फोडलं आहे. या ट्वीटमध्ये उदयनराजे भोसले यांनी “आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट”, असे म्हटले आहे. मात्र, दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतातच या उक्तीनुसार या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती ‘सदिच्छा’ चर्चा झाली, यावरून सध्या चर्चा रंगू लागली आहे.
भाजपामध्ये जाऊन देखील अनेकदा पक्षाच्या काही धोरणांवर नाराजी तर अनेकदा शरद पवारांचं कौतुक आणि आदर अशा भूमिकेमुळे उदयनराजे भोसले यांच्याविषयी नेहमीच राष्ट्रवादीशी अजूनही जवळीक असल्याचं बोललं जात आहे. त्यातच या भेटीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या घरवापसीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.