न्यूयॉर्क : जगातील सर्वात शक्तिशाली महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राजकारणात मोठे बदल झाले असल्याचे समोर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन काही दिवसांसाठी आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कॉलोनोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यामुळे आपल्या पदाचे अधिकार काही काळासाठी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत.
व्हाइट हाऊसच्या वतीने यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. व्हाइट हाउसकडून याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, जो बायडन शुक्रवारी आपले सर्व अधिकार काही दिवसांसाठी कमला हॅरिस यांच्याकडे सुपूर्द करतील. ते पुढे म्हणाले की, बायडन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होणार आहेत. त्यांची कॉलोनोस्कोपी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना अॅनेस्थिसिया देण्यात येणार आहे.
अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येण्यास त्यांना काही काळ लागेल. त्यामुळे ते पूर्णपणे अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येईपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या सर्व जबाबदाऱ्या कमला हॅरिस सांभाळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यात काही वाद झाल्याचे समोर आले होते. हॅरिस यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस यांचे मत गृहित धरले जात आहे, तर बायडन यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस अमेरिकेतील जनेतेसोबत खेळत आहेत. तसेच गेल्या महिन्यात जो बायडन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांचे अप्रूवल रेटिंगही कमी आहे. त्यावेळी अशा चर्चाही रंगल्या होत्या की, कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदावरुन हटवले जाऊ शकते.