पिंपरी, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीतील कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्यांमुळे, राज्यभरातील टायपिंग परीक्षा तब्बल दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ऑक्टोबर आणि मार्च सत्राच्या संगणक टायपिंग परीक्षा एक ते पंधरा एप्रिल दरम्यान नियोजित होत्या. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षा थेट जून महिन्यात होणार आहेत.
परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणाऱ्या विविध जबाबदाऱ्या लक्षात घेता कर्मचारी उपलब्ध होणार नसल्याने, तसेच इतर परीक्षांमुळे अनेक संगणक लॅब आरक्षित असल्याने, परिषदेला हा निर्णय घ्यावा लागला आहे. या परीक्षेसाठी साधारण राज्य भरात एकूण १.६० लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत.
१० जून पासून इंग्रजी विषयाच्या तर १८ जून पासून मराठी, आणि २० जून पासून हिंदी विषयाच्या संगणक टायपिंग परीक्षा होतील. असा आदांज वर्तविला जात आहे. संगणक लघुलेखन परीक्षा जिल्हा स्तरावर २० ते २३ जून दरम्यान होतील तर मॅन्युअल मशिन टायपिंग परीक्षा ७ व ८ जूनला होणार आहे असल्याचा खुलासा शुध्दीपत्रकाद्वारे नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जाहीर केलेला आहे. या दरम्यान नवीन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता यावे यासाठी परिषदेकडून १५ ते २५ एप्रिलचा कालावधी देण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षा पुढे ढकल्याण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी मिळणार असून, त्यामुळे जास्त सराव होईल आणि परीक्षा ही चांगल्या जातील. – संजना माळी, विद्यार्थीनी