खूनप्रकरणी दोन महिलांना अटक 

पुणे – देहविक्री करणाऱ्या व दलाल महिलेने मिळून एका ग्राहकाचा खून केला. ही खळबळजनक घटना बुधवार पेठेतील माचिस इमारतीत गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघाही महिलांना अटक केली आहे.

बुद्धिशय मसोई मगर (21, मूळ रा. नेपाळ) असे मृताचे नाव आहे. अटक महिलांचे अनुक्रमे वय 26 व 58 आहे. सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळीस यांनी फिर्याद दिली आहे.
दलाल महिला व तिच्याकडे देहविक्री करणाऱ्या तरुणीकडे मगर हा नेहमी ग्राहक म्हणून येत होता. तो देहविक्री करणाऱ्या तरुणीकडे नेहमी येत असे. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर त्याने लग्नाचा तगादा तिच्याकडे लावला होता.

दरम्यान, त्याने गावाकडे संबंधित तरुणीचे छायाचित्रही घरच्यांना पाठवले होते. या तरुणीशी लग्न करणार असल्याचे त्याने कळवले होते. तो सातत्याने लग्नाचा तगादा लावत असल्याने तिच्याकडे येणाऱ्या ग्राहकांवरही परिणाम झाला होता. गुरुवारी दुपारीही तो तिच्याकडे आला. तिच्यासोबत त्याचा लग्नावरून पुन्हा वाद झाला. यावेळी दोघींनी त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर तो बेडवर झोपल्यानंतर खाली पडल्याचा बहाणा केला. त्याच्या शवविच्छेदनाच्या अहवालात गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दोघींनाही अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.