शिक्रापूर (प्रतिनिधी) – शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात दुचाक्या चोरणाऱ्या एका आरोपीस दुचाकीसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले असून आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना चोरीतील दुचाकी वापरणारा आणि दुचाकी चोरणारा एक इसम शिक्रापूर चाकण चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर यांना मिळाली. त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, पोलीस नाईक राजू मोमीन, जनार्दन शेळके, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, पोलीस शिपाई प्रसन्ना घाडगे यांनी शिक्रापूर चाकण चौकात सापळा रचला. त्याठिकाणी सदर गुन्ह्यातील संशयित इसम अविनाश गायकवाड हा एका दुचाकी जवळ आढळून आला, त्यावेळेस सदर पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दहा दिवसांपूर्वी शिक्रापूर तळेगाव रोड लगत सर्वेश ऑटो गॅरेज शेजारील बिल्डिंगच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.
याबाबत भुमेश जगन्नाथ गवारी यांनी (रा. तळेगाव रोड, शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याचे समोर आले, यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अविनाश देविदास गायकवाड (वय 19 वर्षे सध्या रा तळेगाव रोड गुरुकृपा बिल्डिंग शिक्रापूर ता शिरूर जि. पुणे, मूळ रा. माळीनगर ता. कडेगाव जि. सांगली) यास त्याच्या ताब्यातील चोरीच्या दुचाकीसह अटक केली असून त्याला शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करत आहे.