चंडीगढ -लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेच्या दोन सदस्यांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा साठा जप्त करण्यात आला. त्या कारवाईमुळे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळला गेल्याचे मानले जात आहे.
पंजाब पोलिसांनी अमृतसर-जम्मू महामार्गावर संशयावरून एक ट्रक अडवला. जम्मू-काश्मीरची नोंदणी असलेल्या त्या ट्रकमध्ये एके-47 रायफल, काही जिवंत काडतुसे आणि 10 हातबॉम्ब सापडले. त्यामुळे ट्रक घेऊन जाणाऱ्या आमीर हुसेन वानी आणि वासीम हसन वानी या दोघांना अटक करण्यात आली. ते दोघे जम्मू-काश्मीरच्या शोपियॉंचे रहिवासी आहेत.
चौकशीवेळी त्यांनी तोयबाचा दहशतवादी इशफाक अहमद डार याच्या निर्देशावरून पंजाबमधून काश्मीरला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा नेत असल्याची माहिती दिली. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी तो साठा वापरला जाणार होता, अशी कबुलीही त्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी याआधी पंजाबमधून मोठी रोकड काश्मीरला नेल्याचेही निष्पन्न झाले. आता पंजाबमधून काश्मीरातील दहशतवाद्यांना कोण मदत पुरवते याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.