दोन हजारांची नोट ‘नको रे बाबा’

 छपाई बंद केल्याने चलनातील प्रमाण कमी : नोटबंदीच्या भीतीने नागरिकांमध्ये संभ्रम

पिंपरी – केंद्र सरकारने नोव्हेंबर 2016 मध्ये पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दोन हजार रुपयांची नोट चलनामध्ये आल्या. मात्र ही नोट आता बाजारात कमी प्रमाणात दिसू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ही नोट बंद होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. त्यावेळी नोट बंद झाली नसून, फक्त छपाई कमी केली आहे, असे आरबीआयने सांगितले. मात्र यानंतरही नागरिकांमध्ये या नोटांबाबत मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे.

सर्वसामान्य नागरिक दोन हजारांची नोट घेण्यास नकार देतात. तसेच अनेक दुकानदारांकडून या नोटाला नकार दिला जातो. पैसे सुट्टे करण्यासह ही मोठी नोट हरविण्याच्या भीतीनेही नागरिक नकार देतात. दोन हजार रुपयांच्या नोटा जवळ बाळगल्या आणि नोटबंदी झाली, तर काय असाही प्रश्‍न नागरिकांपुढे आहे. त्यामुळे दोन हजारांची नोट नको अशी मानसिकता लोकांमध्ये झाली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नोटबंदी केली.

त्यानंतर नागरिकांनी स्वतः जवळचे पैसे बॅंकेमध्ये भरण्यासाठी मोठी झुंबड केली. यामध्ये अनेक नागरिकांना मोठा तोटा सहन करावा लागला. या नोटबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली. मात्र छोट्या व्यवहारांमध्ये ही नोट अडचण ठरत आहे. दुकानदारांकडे साहित्य खऱेदी केल्यानंतर दोन हजार रुपयांचे सुट्टे देण्यास दुकानदार नकार देतात. तसेच ग्राहकही ही नोट स्वीकारण्यास तयार होत नाही.

रिझर्व्ह बॅंकेने जानेवारी 2018 पासून दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. त्यामुळे ही नोट चलनामध्ये कमी येत आहे. त्यामुळे या नोटेवर बंदी तर येणार नाही ना असा प्रश्‍न असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

नेट बॅंकिंगचाही परिणाम
अनेक नागरिकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे वाढला आहे. आपल्या हवी ती वस्तू ऑनलाइन खरेदी करून मोबाईल बॅंकिगमार्फतच बिल भरले जाते. यासाठी प्रत्येक बॅंकेने आपल्या ग्राहकांना नेटबॅंकिंगची सुविधा पुरविली आहे. त्यातून कॅशलेसकडे वाटचाल सुरू आहे. शहरी भागातील सुमारे 80 टक्के जनता ही विविध मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून ऑनालाइन पेमेंट करण्याला पसंती देते. यासोबतच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या माध्यमातूनही व्यवहार पूर्ण केले जातात. पैसे जवळ ठेवले तर ते हरवण्याची व चोरी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नागरिक पैसे स्वतःजवळ ठेवत नाही. त्याचाही परिणाम दोन हजारांची नोट बाजारातून कमी होण्यावर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.