साकोरीत ‘पांढरं सोनं’ ठरतंय ‘पिवळं सोनं’

जुन्नर तालुक्‍यातील वातावरण कापसासाठी पोषक : इतर पिकांच्या तुलनेत खर्चही कमी

अणे – विदर्भ व मराठवाड्यात घेतले जाणारे पीक ज्याची ओळख ‘पांढर सोन’ अशी आहे, म्हणजेच कापूस या पिकाची साकोरी (ता.जुन्नर) येथील काही शेतकऱ्यांना आवड लागली आहे. हे पांढर सोनं साकोरी गावच्या शेतकऱ्यांसाठी पिवळं सोनं ठरत आहे. सध्या या परिसरात कापसाची वेचणी सुरू आहे. हे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असून, जुन्नर तालुक्‍याचे वातावरण या पिकासाठी पोषक असल्याचे साकोरी गावातील शेतकरी रामदास साळवे यांनी सांगितले.

इतर पिकांपेक्षा कमी मशागत करावी लागते. दोन-तीन वेळा फवारणी केली जाते. तरकारी पिकांना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते, तसेच पिकाला भाव कधी कमी तर कधी जास्त मिळतो. या भागात कापसाचे पीक शेतकऱ्यांचे शक्‍यतो नुकसान करणार पीक नाही. कापसाला सध्या क्विंटलला 4 हजार सातशे ते साडेपाच हजार रुपये भाव आहे. एक एकर शेतात पंधरा ते वीस हजार रुपये कापसाला खर्च येतो. पीक जवळ जवळ 15 ते 18 क्विंटल होते म्हणजे एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये शेतकरी नफा मिळू शकतो, तसेच विकण्यासाठी जुन्नर, संगमनेर येथे बाजारपेठ आहेत.

जुन्नर तालुक्‍यातील साकोरी गावातील काही शेतकरी गेल्या तीन-चार वर्षांपासून कापसाचे पीक आपल्या शेतात घेत आहेत. कापूस काढल्यानंतर शेतात दुसरे पीकही घेता येते. यावर्षी एक एकर शेतामध्ये कापसाची लागवड केली आहे. दहा क्विंटल कापूस शेतात झाला आहे. एकरासाठी 20 हजार रुपये खर्च आतापर्यंत आला आहे. कमी कष्टाचं चांगलं पीक येत असल्याने सकोरी गावातील बहुतांश शेतकरी कापूस पिकवतो आहे. गेल्या वर्षी एक एकरमध्ये 15 क्विंटल कापूस पिकला होता. यावर्षी परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे दहा क्विंटल कापूस निघाला आहे. – रामदास साळवे, प्रगतशील शेतकरी, साकोरी

कापूस पिकासाठी मराठवाडा किंवा विदर्भामध्ये असते तसेच उष्ण वातावरण असावे लागते. काळसर जमिनीमध्ये कापसाचे पीक चांगले येते. या पिकाला चार-पाच वेळेस फवारणी करावी लागते. जुन्नर तालुक्‍यामध्ये कापसाचे पीक चांगले येऊ शकते. या पिकाला जास्त बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, याची खबरदारी शेतकऱ्यांना घ्यावी लागते.
– डी. जि. हरदे, कृषी सहाय्यक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.