विधानसभेसाठी तामिळनाडूतुन येणार 7 हजार मतदान यंत्रे : 15 ऑगस्टपर्यंत यंत्रांची होणार तपासणी
नगर – जिल्हा प्रशासनाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून, जिल्ह्यात तब्बल सात हजार मतदानयंत्रांची गरज भासणार आहे. या निवडणुकीसाठी लोकसभेची यंत्रे न वापरता तमिळनाडू येथून बेल कंपनीची नवी एयंत्रे मागवण्यात आले आहेत. हे यंत्रे आणण्यासाठी 2 पथके रवाणा झाले असून कडक पोलीस बंदोबस्तात घेवून येणार आहेत.
या दोन पथकात भुसंपादनचे उपजिल्हाधिकारी उदय किसवे, तहसीलदार महेश शेलार यांची दोन पथके रवाना झाली आहेत.
यामध्ये विशाल सदनापूरकर, नायब तहसीलदार राजेंद्र बेरड, वैभव साळवे, विजय धोत्रे, राजेंद्र शिंदे, अजय काटे यांचा समावेश आहे. ही यंत्रे 10 ऑगस्ट पर्यंत नगर मध्ये येणार असून 15 ऑगस्टपूर्वी या यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीची तयारी भारत निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची पाहणी करून ते निश्चित करणे, स्वीप समितीच्या बैठका आदी कार्यक्रम सुरू आहेत. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 3 हजार 722 मतदान केंद्र असून त्या ठिकाणी निवडणूक शाखेकडून मतदान यंत्रे, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार 7 हजार मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) 5 हजार 230 कंट्रोल युनिट व 5 हजार 450 व्हीव्हीपॅट मागवण्यात आले आहेत. अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आली.