फलटण – फलटण ते पंढरपूर मार्गावरील तांबमळा येथील गुरू हॉटेलच्या पुढे बुलेट मोटारसाकलला दहा चाकी टिपरची धडक बसून फलटण येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फलटण शहरात शोककळा पसरली आहे.
या घटनेबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण- पंढरपूर मार्गावरील तांबमळा येथे असलेल्या गुरू हॉटेलचे पुढे दि. 16 रोजी रात्री बारा- सव्वाबाराच्या सुमारास दहा चाकी टिपरवरील (एमएच 09 एफएल 6088) चालक अमित साह ललनसाह (मुळ रा. ग्राम पोस्ट कटराकला थाना, मोहानिया, जि. कैमुर भभुआँ, बिहार, सध्या रा. आरकेसी प्लॅन्ट, धुळदेव, ता.फलटण) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून समोरुन बुलेटवरील (एमएच11 सीपी 4778) अमिर ताजुद्दीन शेख (वय 32, रा. शुक्रवार पेठ, फलटण) व गणेश सुनील लोंढे (वय 35, रा. मंगळवार पेठ फलटण) यांना समोरून जोराची धडक दिली. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.