रायपुर – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला गोमपद आणि कन्हैगुडा या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. जिल्हा रिझर्व्ह गार्ड आणि सीआरपीएफच्या तुकड्यांनी ही मोहीम राबवली.
यावेळी झालेल्या चकमकीत अन्यही काही नक्षलवादी ठार वा जखमी झाले असावेत पण त्यांच्या साथीदारांनी त्यांना त्या जागेवरून हलवले असे सांगण्यात येते. दरम्यान ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ठार झालेल्या दोघांपैकी एका जणाचे नाव कवासी हुंगा असे असावे असे लक्षात आले आहे. कोंता भागाचा माओवाद्यांचा तो कमांडर होता असे सांगण्यात येते आहे. पण त्याची खातरजमा केली जात आहे.