नवी दिल्ली – करोना विषाणूची बाधा झालेले आणखी 2 रूग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या 5 वर पोहचली आहे.
दिल्ली आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी 1 करोनाबाधित आढळला. दिल्लीतील बाधित नुकताच इटलीवरून परतला. तर तेलंगणमधील रूग्ण दुबईला जाऊन आल्याचे स्पष्ट झाले. करोनाची लक्षणे आढळल्याने दिल्लीतील रूग्ण स्वत:हून आरएमएल रूग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला. तर तेलंगणमधील रूग्ण प्रथम खासगी रूग्णालयात तपासणीसाठी गेला. तिथून त्याला सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले.
करोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून देशभरात 25 हजारहून अधिक जणांना घरांमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. करोनासदृश लक्षणे आढळल्याने देशभरात 37 जणांवर विविध रूग्णालयांत उपचार चालू आहेत. आतापर्यंत 3 हजार 217 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार, 5 रूग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. करोनाने चीनमध्ये हाहाकार उडवला आहे. त्या आजाराने चीनमध्ये 2 हजार 900 हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत.
इतर अनेक देशांत करोनाचा फैलाव झाल्याचे समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर, करोनाबाधित देशांचा प्रवास टाळण्याचे आवाहन भारत सरकारकडून नागरिकांना करण्यात आले आहे.