श्रीनगर – काश्मिरामध्ये कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाला या जिल्ह्यातील निपोरा भागात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे पहाटेच शोधमोहीम हाती घेतली असता त्यावेळी ही चकमक झाली. त्यात हे दोन जण ठार झाले.
तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पण त्याचा ठावठिकाणा मात्र मिळू शकला नाही. तथापि, त्या भागाची नाकेबंदी करून त्याचा शोध सुरू आहे. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
शोपियॉं जिल्ह्यानंतर सुरक्षा दलांना दहशतवाद विरोधातील कारवाईत मिळालेले हे आणखी एक महत्त्वाचे यश आहे. कुलगाम जिल्ह्यातील ही कारवाई अजून सुरूच असल्याचे वृत्त आहे.