नवी दिल्ली- नवी दिल्ली महापालिकेच्या दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांना गेले तीन महिने वेतन मिळालेले नाही, त्यामुळे या डॉक्टरांनी या पैशासाठी पंतप्रधान मोदींपासून केजरीवालांपर्यंत सर्वांना साकडे घातले आहे. येत्या आठवडाभरात हे वेतन मिळाले नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हे डॉक्टर कस्तुरबा हॉस्पिटल आणि हिंदुराव हॉस्पिटलमधील आहेत. तेथे करोनाग्रस्तांवर उपचारही सुरू आहेत.
दिल्लीसह देशाच्या अनेक भागांमध्ये डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना योद्धे म्हणून मोदी सरकारने त्यांच्यावर विमानांमधून पुष्पवृष्टी करून मध्यंतरी त्यांचा सन्मान केला होता. पण आता त्यांच्यावरच वेतन नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. त्यांच्या या आंदोलनाला दिल्लीतील डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठिंबा जाहीर केला आहे. करोनाग्रस्तांवर उपचार करताना अनेक डॉक्टरांनाही करोना झाला असून अनेक वैद्यकीय कर्मचारीही करोनाग्रस्त झाले आहेत. त्यांना पुरेशी साधनेही दिली जात नसल्याचे लक्षात आले आहे.
असे असतानाही हे डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी जीवावर उदार होऊन करोनाग्रस्तांवर उपचार करीत आहेत. पण त्यांच्या वेतनाचीही सोय महापालिकेचे व्यवस्थापन करू शकलेले नाही. दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी त्यांचे निदान एक महिन्याचे तरी वेतन त्वरित देण्याची व्यवस्था करू, असे आश्वासन दिले आहे. स्थायी समिती अध्यक्ष जयप्रकाश म्हणाले की, करोनाच्या लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्न बुडाले असून त्यामुळे महापालिकडेपुढे मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही स्थिती डॉक्टरांनी लक्षात घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.