पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या (Lalit Patil) दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. ससून रूग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललितला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललितने नाशिकमधील मैत्रिणींकडून २५ लाख रुपये घेतले होते. चेन्नईतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता.
गेले पंधरा दिवस पुणे पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी दिवसरात्र तपास करत होते. ललितने ससून ते चेन्नईपर्यंत प्रवास कसा केला. त्याला आश्रय कोणी दिला ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ललितला त्याच्या मैत्रिणींनी पसार होण्यास मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने दोघींना अटक केली आहे. सध्या दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून त्यांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ललित पाटील ससून रुग्णालययातून पसार झाल्यानंतर मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिला भेटण्यासाठी नाशिकमध्ये आला. त्यानंतर अर्चना निकम या दुसऱ्या मैत्रीणीला देखील तो भेटला. या दोघांकडून पैसे घेऊन तो पुढे पसार झाला. ललित पाटील मेफेड्रॉन विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही वाटा या दोघींवर खर्च करत होता. ललित पाटील दोन आठवडे फरार असताना या दोघींच्या सतत संपर्कात होता. ही माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी मोठी कामगिरी करत या दोघींना अटक केली आहे. आता या दोघींच्या चौकशीनंतर यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.