चंद्रपूर- परिसरात वाघाचा वावर असल्याचे कळले तर वन विभागाची गस्त वाढेल आणि आपला अवैध मद्य व्यवसाय धोक्यात येईल, या भीतीने निर्दयी दारू विक्रेत्यांनी विषप्रयोग करून वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांना गजाआड करण्यात आले आहे.
सूर्यभान ठाकरे, श्रावण मडावी आणि नरेंद्र दडमल अशी अटक करण्यात आलेल्य आरोपींची नावे आहेत. हा भीषण प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोंडेगाव शेतशिवारात घडला. या परिसरात वाघाचा वावर आहे. वाघ असल्यामुळे नियमित गस्त होईल आणि तसे झाले तर दारू व्यवसाय बंद पडेल, या भीतीने आरोपींनी मृत डुकरावर व परिसरात साठवलेल्या मोहफुलांवर विष टाकले. वाघीण व तिच्या बछड्यांनी डुकराचे विषयुक्त मांस खाताच तडफडून प्राण सोडले; परंतु आरोपींना वाघीण व तिच्या बछड्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही.
टाळेबंदीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी पूर्णत: बंद असताना 10 जून रोजी मोहर्ली (बफर) वनपरीक्षेत्रातील नाल्यामध्ये वाघिणीसह तिच्या दोन बछड्यांचे कुजलेले मृतदेह आढळले. तसेच शेजारीच माकडांचे देखील मृतदेह होते. प्राथमिकदृष्ट्या वाघीण तसेच दोन बछड्यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याच्या संशयावरून ताडोबाच्या क्षेत्र संचालकांनी तपास केला असता हे बिंग फुटले.