कात्रज- स्व.राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील 21 वर्ष वयाच्या वाघिणीचा शुक्रवारी (दि.1) संध्याकाळी 5:30च्या सुमारास वृद्धापकाळाने मृत्यू झाला. दोन-चार दिवसांपासून तिने खाणेपिणे सोडले होते. साधारणपणे वाघाच्या प्रजातीमध्ये वाघांचे वयोमान हे 16 ते 18 वर्ष असते. प्रियदर्शनी वाघीणीचे मृत्यसमयी वय पूर्ण 21 वर्ष 10 महिने होते.
डॉ. चंद्रशेखर मोठे यांच्यामार्फत शवविच्छेदन केल्यानंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालयात रात्री 7:30च्या सुमारास तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.
प्रियदर्शनीला वार्धक्यामुळे मागील चार ते पाच वर्षांपासून व्यवस्थित चालता येत नसल्याने तिची वेगळ्या पिंजऱ्यात देखभाल केली जात होती. आणखी दोन-तीन महिने प्रियदर्शनी जगेल, अशी आशा सर्वांना होती. परंतु, आज तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या आता आठवरून सात झाली असल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले.