बीजिंग – चीनची पोलादी भिंत चंगेज खान आणि मान्चू राजघराण्याच्या योद्ध्यांनी फोडल्याचे इतिहासामध्ये म्हटले आहे. मात्र, आता ही अतिभव्य भिंत खणून तेथून एक “शॉर्ट कट’ काढणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
या दाम्पत्याने जमीन खणण्याच्या यंत्राच्या मदतीने चीनच्या भिंतीमध्ये एक भगदाड पाडले होते. हा मार्ग “शॉर्ट कट’ म्हणून वापरण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
चीनच्या भिंतीच्या काही भागाचे अलीकडेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या भागापासून दूरवर एका ठिकाणी या भिंतीची मोडतोड केल्याचे उघड झाले होते.
या भगदाडामधूनच एक रस्ता खणण्यात आला असल्याचे वृत्त चीनमधील स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. राजधानी बीजिंगपासून शेकडो किलोमीटर अंतरावर योयू कौंटीमध्ये हा भिंतीतून खणून काढलेला रस्ता उघड झाला होता.
हा उद्योग 35 वर्षीय एका पुरुषाने आणि 55 वर्षीय महिलेने केला होता. हे दोघेही बांधकाम मजूर असून जवळच एका गावामध्ये त्यांचे बांधकाम सुरू आहे. तेथे जाण्यासाठी “शॉर्ट कट’ मिळावा म्हणून त्यांनी यंत्राच्या सहाय्याने भिंतीला भगदाड पाडले.
या भिंतीची तोडफोड केली गेल्याचे 24 ऑगस्टला उघड झाल्यावर योयू कौंटीच्या प्रशासनाने या दोघांना अटक केली. चीनची भिंत तब्बल 8850 किलोमीटर लांबीची असून 1644 मध्ये अस्त झालेल्या मिंग राजघराण्याच्या कालखंडात या भिंतीचे बांधकाम झाले होते. चीनच्या भिंतीला “युनेस्को’ने वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे.