प्रयागराज – लॅपटॉप बाबा, मोबाईल बाबा बरोबरच माघ मेळ्यामध्ये आणखी काही नव्या टोपण नावांचे बाबाही दाखल झाले आहेत. त्यामध्ये हिटलर बाबा आणि ट्रम्प बाबा अनेकांच्या आकर्षणाचे विषय आहेत. खरे तर हिटलर बाबा हे प्रख्यात दिगंबर आखाड्याचे महामंडलेश्वर माधव दास आहेत.
परंतु त्यांचा शिष्यगण त्यांना हिटलर बाबा या नावाने ओळखतो. कारण वागण्याबोलण्यात ते अतिशय कडक आहेत. ते प्रयागराजजवळील सैदाबादचे आहेत. त्यांच्या संतापी स्वभावामुळे त्यांचे गुरू रघुवरदास यांनी त्यांना हे टोपण नाव दिलेले आहे.
हिटलर बाबा म्हणतात, मला जे योग्य वाटते तेच मी करतो आणि नंतर ते बरोबरही ठरते. संन्यास घेण्याचा निर्णय माझा होता आणि त्यावर अडून होतो. माझ्या गुरूंनी मला हिटलर बाबा हे नाव दिलेले आहे.
त्यांच्या काही जुन्या निर्णयांबाबतच्या आठवणी सांगताना ते म्हणतात, दिशा शूळ अशुभ असल्याने माझ्या गुरुंनी मला प्रवास करण्यास परवानगी नाकारली होती. पण माझे गुरू माझ्याबरोबर असतील तर प्रत्येक दिवस शुभ आहे, असे म्हणून मी प्रवासाला निघालो.
त्यांच्याप्रमाणेच संकेत धाम आश्रमाचे महंत कांचन दास हे बी. कॉम झालेले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ते ट्रम्प यांचे चाहते बनले. महंत कांचन दास यांचे इंग्रजी भाषेवर अतिशय प्रभुत्व असल्याने त्यांचे गुरू विनायक बाबा यांनी त्यांचे नामकरण ट्रम्प बाबा असे केले. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण नावामुळे ते प्रसिद्ध झाले. रोजच्य भंडाऱ्यात काय शिजवायचे याचा निर्णय ट्रम्प बाबा घेत असतात.
बाबांना अशी टोपणनावे देण्याची परंपरा काही नवी नाही. शिष्याचे गुण आणि वागणूक पाहून गुरू त्यांना टोपण नावाने हाक मारू लागतात आणि तेच नाव त्यांना चिकटते. अशा नावांमुळे भक्तगणांमधील कुतूहल जागृत होते, असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी व्यक्त केले आहे.