नवी दिल्ली – तब्बल एक वर्ष सर्वांना जेरीस आणणारा करोना अद्याप अटोक्यात यायच नाव घेत नाहीये. जगभरात करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीचे संशोधन करण्यात आले. अनेक लसींना यशही आले. त्यानुसार लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र लस घेतलेल्या तीन डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याचा समोर आले आहे.
हिमाचल प्रदेशच्या सिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात काम करणाऱ्या तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या महाविद्यालयाचे आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रजनीश पठानिया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या लसीचा पहिला डोस मिळाल्यानंतर हे तिन्ही डॉक्टर नियमितपणे आपल्या कर्तव्यावर रुजू होते. या दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली असावी किंवा लस मिळण्यापूर्वीच ते कोरोनाग्रस्त झाले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेचा लसीच्या उपयुक्ततेशी काहीही संबंध नाही. कारण लस घेतल्यानंतर जवळपास तीन ते चार महिन्यांनी तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे या घटनेचा लसीशी संबंध जोडणं योग्य नसल्याचं डॉ. रजनीश पठानिया यांनी म्हटले आहे.