हैदराबाद – असे कोणतेच काम नाही की, एकदा मनावर घेतल्यास महिला ते पूर्ण करू शकत नाहीत. ट्रकची वेल्डिंग करणे, पंक्चर काढणे किंवा इतर छोटे-मोठे रिपेअरिंग चे काम असो, अशा कामांसाठी पुरूषांचा विचार डोक्यात येतो. मात्र, तेलंगणातील 30 वर्षीय आदिलक्ष्मी या राज्यातील एकमेव महिला आहेत ज्या ही सर्व कामं सहजतेने करतात.
मोठ-मोठ्या ट्रकच्या टायरचे पंक्चर काढणे, रिपेअर करणे हे आदिलक्ष्मी यांच्या डाव्या हाथाचा खेळ आहे. तेलंगाना येथील कोथागुडेम जिल्ह्यातील सुजातानगरमध्ये आदिलक्ष्मी ह्या आपले पती वीरभद्रम यांच्यासोबत टायर रिपेअरिंगचे शाॅप चालवतात. त्यांना दोन मुली देखील आहेत. सर्व संसार सांभाळून त्या टायर रिपेअरिंगचे काम करतात आणि संसाराला हाथभार लावतात.
तीन वर्षाआधी आदिलक्ष्मी आणि त्यांच्या पतीने टायर रिपेअरिंगचे शाॅप उघडले होते. पैशांची चणचण असल्यामुळे व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांना त्यांचे घर गहान ठेवावे लागले होते. टायरचे व्यवस्थित पंक्चर काढतील की नाही यामुळे सुरूवातील ग्राहक आदिलक्ष्मी यांच्या शाॅपवर जात नव्ह्ते. मात्र, नंतर त्यांची कामाची कुशलता पाहून ग्राहकांची रीघ लागली. आता त्यांचे शाॅप 24 तास उघडे असते आणि ग्राहकही त्यांच्या कुशल कामगिरीमुळे खूश आहेत.
आदिलक्ष्मी म्हणतात, ‘आमच्यावरील कर्ज वाढत चालले होते, त्यामुळे मी पतीच्या कामात मदत करण्याचा निश्चय केला. मला दोन मुली आहेत. आमच्याकडे कमी प्रमाणात औजारं आहेत मात्र यावर आमचे काम चालते. जर मला सरकारकडून काही मदत मिळाली तर माझ्या मुलींचे भवितव्य सुधारण्यासाठी मोठी मदत होईल.’
आदिलक्ष्मी या टायर फिटिंग करण्यासोबतच एक कुशल वेल्डर आणि मेटल फ्रेम फ्रॅबिकेटर आहेत. कोथागुडम असा एरिया आहे जेथे मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते.