“हीच खरी लीडरशीप” ! दुर्लक्षित रहाणेच्या नेतृत्वगुणांचे थरूर यांच्याकडून कौतुक

मुंबई – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने  तीन गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने  बॉर्डर-गावसकर मालिका जिंकून इतिहास घडवला. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. त्यामुळे अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काँग्रेसनेते आणि खासदार शशी थरूर यांनी आपल्या हटके अंदाजात भारतीय संघाचे अभिनंदन करत दुर्लक्षित अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वगुणांचे तोंडभरून कौतुक केले.

भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने विजयी भारतीय संघाचा फोटो ट्विट केला. त्याला रिट्विट करत अजिंक्यने म्हटले की, या टीमचा भाग होतो, याचा मला अभिमान आहे. वास्तविक पाहता रहाणे विजयी संघाचा कर्णधार होता. तरी त्याने विजयाचे श्रेय संघातील सर्व खेळाडूंना दिले. यावर थरूर यांनी भाष्य केले.

थरूर यांनी फेसबुक पोस्टमधून म्हटले की, भारतीय संघाच्या विजयात शानदार खेळाडू ऋषभ पंत, चिवट फलंदाज चेतेश्वर पुजारा, भावनिक मोहम्मद सिराज, शांत, संयमी वॉशिंग्टन सुंदर, महत्त्वाकांक्षी शार्दूल ठाकूर, आक्रमक शुभमन गिल, दमदार रोहित शर्मा, मयंक अग्रवाल आणि नवदीप सैनी हिरो ठरले यात शंका नाही. मात्र शांत आणि संयमी नेतृत्वात मालिका जिंकून देणाऱ्या रहाणेच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत थरूर यांनी व्यक्त केली.

I can’t stop gushing about this Test’s many heroes, the brilliant Rishabh Pant, reliable Cheteshwar Pujara, emotional…

Posted by Shashi Tharoor on Tuesday, 19 January 2021

पहिल्या कसोटी सामन्यातच ढासाळलेली कामगिरी, त्यात आक्रमक फलंदाज आणि कर्णधाराची गैरहजेरी आणि स्टार वेगवान गोलंदाज जखमी, त्यामुळे कोणताही आशा दिसत नव्हती. अशा वेळी रहाणेने नेतृत्वाची कमान सांभाळली. अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्याने संघातील खेळाडूंकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेतली. कधीही आवाज न उंचावता किंवा कर्णधार असल्याचा अविर्भाव न दाखवता त्याने संघाला विजय मिळवून दिला. हीच खरी लीडरशीप असल्याचं थरूर यांनी म्हटले.

दरम्यान अजिंक्य रहाणेने या मालिका विजयाचे क्रेडीट घ्यायला हवं, असं म्हणेन. परंतु, रहाणे तसं करणार नाही. तो विजयाचं क्रेडीट संपूर्ण संघाला देईल. अजिंक्यने ज्याप्रकारे विजयाचा चषक आपल्या ज्यूनियर खेळाडूकडे सोपविला, हीच एका महान कर्णधाराची निशानी असते. जो संघातील सहकाऱ्यांना आपला भागीदार बनवतो आणि मोठ्या विजयाचा मालक बनतो, या शब्दांत थरूर यांनी रहाणेचे कौतुक केलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.