भाजपला प्रतिशह देण्यासाठी तृणमूल लढवणार ‘अशी’ शक्कल

आगामी निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती जवळपास निश्‍चित

कोलकता – पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसला घेरण्यासाठी भाजपने हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आधारित आक्रमक मोहिमेवर भर देण्याचे संकेत दिले आहेत. त्याला प्रतिशह देण्यासाठी तृणमूलकडून बंगाली अस्मितेचा आधार घेतला जाणार आहे.

बंगालमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी आता पाच-सहा महिन्यांचाच कालावधी बाकी आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सज्ज होत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत भाजपकडून प्रामुख्याने हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे मुद्दे प्रचारावेळी उपस्थित केले जाणार असल्याचे सूचित होत आहे.

आता तृणमूलनेही प्रचारासाठीची आपली रणनीती जवळपास निश्‍चित केली आहे. विकासाबरोबरच बंगाली अस्मिता हा आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहील, असे तृणमूलच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. तमिळनाडूतील राजकीय पक्ष तमीळ अस्मितेवर भर देतात. तर, महाराष्ट्रात शिवसेनेकडून मराठी अस्मितेवर जोर दिला जातो. त्याप्रमाणेच बंगाली संस्कृतीचा संरक्षक म्हणून पुढे येण्याची तयारी तृणमूलने सुरू केली आहे.

बंगालची निवडणूक तोंडावर आल्याने मागील काही दिवसांपासून तृणमूल आणि भाजपमधील शाब्दिक युद्धाची तीव्रता वाढल्याचे दिसते. भाजपकडून सातत्याने तृणमूल आणि त्या पक्षाच्या प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले जात आहे. त्याला तृणमूल आणि विशेषत: ममतांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

भाजपची भिस्त प्रामुख्याने केंद्रीय नेतृत्वावर आहे. नेमके तेच हेरून तृणमूलने भाजपचा बाहेरच्यांचा पक्ष असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपला काहीसा बचावाचा पवित्रा स्वीकारावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुखावलेल्या तृणमूलने आता बंगाली अस्मितेला महत्त्व देण्याचे ठरवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.