नवी दिल्ली : पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2023 हंगामापूर्वी विश्वचषक विजेते प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. बेलिस यांनी यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणूक काम केले आहे. यावेळी आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी पंजाबच्या आशा या ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकावर असतील.
बेलिस यांनी 2019 मध्ये इंग्लंडला त्यांचे पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले होते. तसेच 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्ससचे ते चीफ ऑफ सपोर्ट स्टाफ देखील होते.
बेलिस भारताचा दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळेची जागा घेतील. कुंबळेच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
आयपीएलच्या इतिहासात पंजाबने 2014 मध्येच एकदाच अंतिम फेरी गाठली होती ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.