नगर – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्रच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र काही समाज कंटकांकडून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याचा काळाबाजार सुरु असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. टरबुजाच्या टेम्पोमधून बेकायदा तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणारे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 15 लाख 54 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी रमजान मन्सूर पठाण (वय- 28, रा. संजयनगर, अ. नगर), अयाज इस्साक बागवान, (वय-39, रा. गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, अ. नगर) यांना ताब्यात घेतले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार काटवन खंडोबा परिसरात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काळाबाजार सुरू असून, एका टेम्पोमधून टरबुजाच्या नावाखाली तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रिशिर माहिती मिळाली.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, सचिन आडबल, रवींद्र कर्डिले, संदीप दरंदले, रवींद्र धुंगासे यांनी काटवन खंडोबाजवळ सापळा रचला. यावेळी तेथे टेम्पो आला असता पथकाने त्यास अडवले. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता, पाठीमागील हौदामध्ये नऊ हजार रुपये किमतीची एक टन टरबुजे, तसेच टरबुजांखाली एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या सुगंधी तंबाखूच्या प्रत्येकी 10 किलो वजनाच्या 105 बॅग, असा सहा लाखांचा मुद्देमाल, तसेच टेम्पो (क्र. एमएच-04 डीके- 5268), असा एकूण 15 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सुगंधी तंबाखू कोठून खरेदी करण्यात आली, त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.