सातारा -सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत एकूण सहा सवर्गामधील एक हजार 288 शिक्षकांच्या बदल्या झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
गेल्या तीन महिन्यापासून जिल्हांतर्गत व जिल्ह्याबाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सुरु आहे. संवर्ग एक, दोन, तीन व चार, विस्थापित राऊंड व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन बदली आदेश प्रसिध्द करण्यात आले आहेत. याआधी विविध संवर्गातील शिक्षकांच्या
ऑनलाईन बदल्या आज झाल्या आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण, पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर, दोघांपैकी एक जिल्हा परिषद व दुसरा राज्य शासनाचा कर्मचारी असेल तर, एक जिल्हा परिषद व दुसरा केंद्र शासनाचा कर्मचारी असेल तर त्यांना संवर्ग दोनमध्ये प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार बदली प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती शबनम मुजावर यांनी दिली.