पिंपरी, (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदार संघातंर्गत येणार्या चिंचवड विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने थेरगाव येथील स्व. शंकर गावडे कामगार भवन येथे सेक्टर अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला हे उपस्थित होते.
या अंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघातंर्गत सेक्टर अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणासाठी 48 सेक्टर अधिकारी, 48 सहाय्यक आणि 5 राखीव सेक्टर अधिकारी उपस्थित होते.
यातील 5 सेक्टर अधिकार्यांना जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय मतदान यंत्राच्या हाताळणीचेदेखील प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे.
मतदान केंद्रावरील संपूर्ण तयारी, मतदानापूर्वीची तयारी, मतदानावेळीची तयारी आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची तयारी याबाबतची सविस्तर माहिती विठ्ठल जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना दिली.
मतदान साहित्य ताब्यात घेणे आणि जमा करणे याबाबतची देखील माहिती यावेळी देण्यात आली. मतदान केंद्राची स्थिती आणि त्याठिकाणी करावयाच्या उपाययोजना याबाबतची तपशीलवार माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली.
प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण कार्यकारी अभियंता बापू गायकवाड व उपअभियंता प्रकाश कातोरे यांनी दिले. मतदान यंत्र सिलींग आणि कमिशनिंग याबाबतची माहिती देखील प्रशिक्षणार्थींना देण्यात आली.
यानंतर प्रशिक्षणार्थींकडून मतदान यंत्र हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक देखील करून घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी 40 मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. सेक्टर अधिकार्यांचे समन्वय अधिकारी अजिंक्य येळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.