पुणे – महंमदवाडी मधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत तीन रस्ते विकसित केले जाणार आहेत. यासाठी 118 कोटींचा खर्च अपेक्षित असून याच्या निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत.
या रस्त्यांमुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटण्यासह मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी जागा उपलब्ध होणार असल्याने या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या भागाचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
या भागात गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. या भागात विकास आराखड्यात रस्ते प्रस्तावित करण्यात आले असले तरी निधी अभावी रस्त्यांसाठीचे भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील इतर भागात पीपीपीच्या विकासकामांच्या धर्तीवर या भागातही रस्ते विकसित करण्यासाठी निविदा काढली आहे.
यात महंमदवाडीतील तीन रस्ते विकसित केले जाणार असून त्यात महंमदवाडी ते रामटेकडी औद्योगिक वसाहत सर्वे क्र. 40 ते 76 मधून जणारा 30 मीटर रूंद रस्ता, महंमदवाडी सर्वे क्र. 1 ते 4 96, 57 ते 50 मधून जाणारा 24 मीटर रस्ता तसेच महंमदवाडी सर्वे क्र.12.13, 30,32, 57 मधून जाणाऱ्या 18 मीटर रस्त्याचा समावेश आहे.
“सुमारे साडेचार किलोमीटरचे रस्ते असून त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासह या भागात मोठ्या प्रमाणात बांधकामास क्षेत्रास चालना मिळणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिकेकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला असून रस्त्याचा या भागाला फायदा होणार आहे.”
– प्रमोद भानगिरे, शहर प्रमुख, शिवसेना