शिक्रापुरात कोंडी सोडविण्यासाठी पोलीस रस्त्यावर : वाहनचालकांसह नागरिक त्रस्त
शिक्रापूर – येथील पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीने नेहमीच चर्चेत असून सध्या दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यामुळे अनेक नागरिक व प्रवासी गावाला जाऊ लागलेले आहेत. आता नगर रस्त्यावर तीन दिवसांपासून प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शिक्रापूर पसिरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. पोलिसांची दिवाळी वाहतूक कोंडी सोडविण्यात जात आहे.
शिक्रापूर येथील मुख्य चौक तसेच पुणे नगर रस्ता वाहतूक कोंडी राज्यात गाजत आहे. आजपर्यंत अनेकदा रस्त्याचा विषय विधानसभेत गाजला गेला. कित्येकदा पुणे-नगर रस्ता रुंदीकरणाबाबत चर्चा झाल्या. पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत कित्येकदा आमदार, खासदार व मंत्री अडकले आहेत. अनेक वर्षांपासून नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला नाही. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे कामगार, नागरिक बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे नगर रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनही भर पडली आहे.
नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोंढापुरी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, लोणीकंद, वाघोली येथे मुख्य चौकात वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत. वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. त्यामुळे काही वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने चालवीत असल्यामुळे वाहतूक कोंडी विस्कळीत होत आहे.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने जादा वाहतूक पोलीस कार्यन्वित केले आहेत. मात्र, तरी पोलिसांची दमछाक होत आहे.
कित्येकदा पोलिसांनी एका बाजूने वाहने थांबवून वाहनांच्या रांगा असलेल्या नगर रस्त्यावरील वाहने दोन दोन लेनने सोडली आहेत. मात्र, वाहनांची संख्या जास्त आणि रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांच्या रांगा चार ते पाच किलोमीटरपर्यंत पोहचत आहेत; परंतु पुणे नगर रस्त्यावरील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.
रुग्णवाहिकांना कोंडीचा फटका
पुणे-नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये अनेक वाहने अडकत आहेत. ठिकठिकाणच्या रुग्णालयांतून पुणे येथे उपचारासाठी रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे त्या रुग्णवाहिकांच्या सायरनच्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत असताना रुग्णवाहिकांना फटका बसत आहे. यात रुग्णांना जीव गमविण्याची वेळ येत आहे.