केळघर -केळघर घाटात वरोशी गावच्या लवंडकी शिवारात मोठी दरड झाडाझुडपासह मुख्य रस्त्यावर कोसळल्याने सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. या घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी ए. ए. मेमन व वरोशीचे तलाठी एम. आर. डोईफोडे यांनी बांधकाम विभागाशी त्वरित संपर्क साधला. त्यानंतर पोकलॅन मशीनद्वारे काही वेळात दरड हटवून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला.
केळघर-महाबळेश्वर पावसाची संततधार सुरू झाली आहे. या मार्गावर रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने केळघर घाटात दरडी कोसळत आहेत. या रस्त्याने जाताना वाहने जपून चालवावीत, असे आवाहन बांधकाम व महसूल विभागाने केले आहे. पाऊस सुरू होताच पहिल्याच दिवशी घाटात मोठ्या दरडी व झाडेझुडपे रस्त्यावर येत आहेत.
त्यामुळे रस्ता घसरडा झाला असून घाटातील मोऱ्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत. आता कुठे पावसाला सुरुवात झाली असून यापुढे पावसाचा जोर वाढल्यास वाहनधारकांना मन:स्ताप सहन करावा लागणार आहे. या घाटात अपघात होण्याचीही शक्यता असल्याने बांधकाम विभागाने रस्ता सुस्थितीत ठेवण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.