पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पुण्यातील राज्य कर अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार आफताफ रेहमानी याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मे. अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने वस्तू व सेवाकर कायदा 2017 याअंतर्गत नोंदणी दाखला घेतला.
या कंपनीच्या माध्यमातून आफताफ रेहमानी याने 200 कोटी रकमेची फक्त बिले देऊन 41 कोटी 95 लाखांचा आय. टी. सी. (इनपुट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून सुमारे 27 कोटी 7 लाख रकमेचा परतावा प्राप्त करून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.