कर्जत – कृषी विभागाकडून ट्रॅक्टर व इतर औजारे यांना अनुदान दिले जाते. मात्र, ट्रॅक्टर व औजाराच्या किंमती देखील वाढलेल्या आहेत, मात्र आधीच विविध समस्यांनी ग्रासलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पद्धतीने ट्रॅक्टर व औजारे खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. हीच अडचण ध्यानात घेऊन कृषी विभागाने भाडेतत्त्वावर औजार बॅंक ही योजना आणली आहे.
शुक्रवारी तालुक्यातील 27 औजार बॅंकधारकांची कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व औजार बॅंक धारकांना या योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. आत्मांतर्गत शेतकरी गटांना 10 लाख मर्यादेत ट्रॅक्टर व इतर औजारे खरेदीसाठी पूर्वसंमती दिली जाते, अशा औजार बॅंकेस 4 लाख अनुदान कृषी विभागाकडून दिले जाते.
या औजार बॅंकमधील ट्रॅक्टर व औजारे ही भाडेतत्त्वावर गावातील इतर शेतकऱ्यांना वापरण्यास देणे अपेक्षित आहे. ट्रॅक्टर व औजाराचा भाड्याचा दर हा प्रचलित बाजारदरापेक्षा 20 टक्केने कमी ठेवला जातो. खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांची शेतीच्या मशागतीसाठी लगबग चालू आहे तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या औजार बॅंकमधील औजारे कमी दराने भाड्याने घेऊन वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.