Todays Top 10 News: बॅलेट पेपरवर काँग्रेसचा विजय आणि पवारांच्या लेकीचं RSS कुटुंबात नातं; आजच्या टॉप बातम्या एका क्लिकवर
Todays Top 10 News: वाचा आजच्या टाॅप 10 बातम्या

Todays Top 10 News: मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी; लाचखोरी प्रकरणी लिपिकाला अटक
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलीय. औषध दुकानाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईत कार्यालयातून अधिकची रोकडही जप्त करण्यात आलीय. चौकशीत खासगी सचिवाचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली असून न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची कोठडी सुनावलीय. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्री झिरवाळ यांनी चौकशीत दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
संबंधित वृत्त – मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचा आरोप
मुलुंड मेट्रो दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा
मुंबईतील मुलुंड येथे मेट्रोच्या कामादरम्यान सिमेंटचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतलीय. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झालेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा भाग रिक्षा आणि कारवर कोसळल्याने हा भीषण अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला आणि जखमींना शासनस्तरावरून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मेट्रो प्रकल्पांच्या सुरक्षेचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिलेत.
सविस्तर वृत्त – मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळताच मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
‘त्या’ व्हिडीओवर नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका; केवळ मध्यस्थी केल्याचा दावा
अलिबागच्या म्हात्रोळी येथील जमिनीच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जमीन लाटण्याचा आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला होता.
यावर स्पष्टीकरण देताना नार्वेकर म्हणाले की, शेतजमिनीकडे जात असताना दोन शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसले. माणुसकीच्या नात्याने केवळ त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आणि तिथून पुढे निघून गेलो, त्या घटनेशी माझा कोणताही थेट संबंध नाही. दरम्यान, स्थानिक जागा मालक रमेश पाटील यांनीही नार्वेकरांचे समर्थन केले असून, हा वाद कौटुंबिक असल्याचे सांगत नार्वेकरांनी केवळ वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याची पुष्टी केलीय.
कौटुंबिक नात्याला राजकीय रंगाची फोडणी; रेवती सुळेचा विवाह नागपूरच्या लखानी घराण्यात
खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीचा विवाह नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र सारंगशी निश्चित झाला असून, या नात्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलेय.
अरुण लखानी यांची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक म्हणून असल्याने, पुरोगामी विचारांच्या पवार कुटुंबाने हे नाते का जोडले, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय. काही राजकीय विश्लेषक याकडे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत म्हणून पाहत आहेत. दरम्यान, हे लग्न कोणाच्याही मध्यस्थीने ठरलेले नसून, रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेय. कौटुंबिक संमतीने आणि सर्वांच्या आशीर्वादाने हे लग्न ठरल्याचे त्यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त – शरद पवारांच्या नातीचा ‘संघा’च्या घरात प्रवेश
बॅलेट पेपरवरील निवडणुकीत काँग्रेसचा विजय; भाजपाला पराभवाचा मोठा धक्का
तेलंगणात बॅलेट पेपरवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत ११६ पैकी ७० नगर परिषदा आणि ७ पैकी ४ महानगरपालिकांवर आपला झेंडा फडकावलाय.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या ‘जनमत चाचणी’त काँग्रेसने २,९९५ पैकी १,५३७ प्रभागांमध्ये विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. दुसरीकडे, भाजपाला केवळ ३३६ जागांवर समाधान मानावे लागले असून, माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने ७८१ जागांसह दुसरे स्थान पटकावलेय. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका झालेल्या या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसच्या वाढत्या जनाधारावर शिक्कामोर्तब झालेय.
सविस्तर वृत्त – तेलंगणात काँग्रेसचा मोठा विजय; बॅलेट पेपरवरील स्थानिक निवडणुकीत BJP-BRS ला धक्का
बांगलादेशचे भारतासोबत संबंध कसे असतील? भावी पंतप्रधानांचे एकाच वाक्यात उत्तर
बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी ऐतिहासिक विजयानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली. ३६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बांगलादेशची सत्ता एका पुरुष पंतप्रधानाच्या हाती जाणार असून, रहमान यांनी सुशासनाचे आश्वासन दिलेय. भारत-बांगलादेश संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत ‘आमच्यासाठी बांगलादेश आणि येथील जनता प्रथम आहे, त्यानुसारच परराष्ट्र धोरण ठरेल’ असे एका ओळीत उत्तर दिले.
शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाबाबत बोलताना त्यांनी हा विषय कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असल्याचे सांगितले. २९९ पैकी २१२ जागा जिंकून सत्तेत आलेल्या बीएनपीने चीनसोबतच्या विकास कामांना गती देण्याचे संकेत दिले असून, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे रहमान यांनी स्पष्ट केलेय.
पती-पत्नीला मिळणार दरमहा 9250 रुपये व्याज; पोस्ट ऑफिसची MIS योजना पहा काय
सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची ‘मंथली इनकम स्कीम’ MIS अत्यंत फायदेशीर ठरतेय. या योजनेत पती-पत्नी मिळून संयुक्त खाते उघडल्यास त्यांना दरमहा ९२५० रुपये फिक्स व्याज मिळू शकते. सध्या या योजनेवर ७.४ टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात असून, एकदाच गुंतवणूक केल्यानंतर पुढील पाच वर्षे नियमित उत्पन्न सुरू होते.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये, तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही पत्नीसोबत १५ लाख रुपये गुंतवले, तर पाच वर्षांच्या मुदतीपर्यंत दरमहा व्याजाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. मुदत संपल्यानंतर तुमची मूळ रक्कमही सुरक्षितपणे परत मिळते. हे खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना बचतीचा एक उत्तम पर्याय ठरतेय.
कंगना रणौत आणि अध्ययन सुमन यांच्या प्रेमाची गोष्ट ; 20 वर्षांनंतर शेखर सुमन यांची प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अध्ययन सुमन यांचे २००८ मधील नाते पुन्हा एकदा चर्चेत आलेय. ‘राज: द मिस्ट्री कंटिन्यूज’च्या सेटवर सुरू झालेले हे प्रेमसंबंध वर्षभरातच अत्यंत कटू वळणावर संपले होते. ब्रेकअपनंतर अध्ययनने कंगनावर काळी जादू आणि मारहाण केल्याचे खळबळजनक आरोप केले होते, ज्यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, आता अनेक वर्षांनंतर अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी या जुन्या वादावर मवाळ भूमिका घेतलीय. शेखर सुमन यांच्या मते, दोघेही एकत्र असताना आनंदी होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. भूतकाळातील कटू आठवणी विसरून आता दोन्ही कुटुंबे आयुष्यात पुढे गेली असून, कोणाबद्दलही मनात आता राग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्माचे पुनरागमन निश्चित; सूर्याने संपवला सस्पेन्स
पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी भारतीय गोटातून आनंदाची बातमी समोर आलीय. सलामीवीर अभिषेक शर्मा आजारपणातून पूर्णपणे बरा झाला असून तो रविवारी मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत मिश्किलपणे अभिषेकच्या निवडीचे संकेत दिले.
आजारी असल्यामुळे अभिषेक नामीबियाविरुद्ध खेळू शकला नव्हता, जिथे संजू सॅमसनने सलामी दिली होती. मात्र, आता अभिषेक पुन्हा इशान किशनसोबत डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १२९७ धावा करणाऱ्या अभिषेकला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे आई-वडीलही कोलंबोत दाखल झालेत.








