Mulund Accident: मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, तिघे जखमी; मृतांच्या वारसाला 5 लाखांची मदत जाहीर
Mulund Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर खोल दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली

Mulund Accident: मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोडवर मेट्रो-४ मार्गिकेच्या बांधकामादरम्यान शनिवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. मेट्रो पुलाच्या पॅरापेटचा (स्लॅब) एक मोठा भाग उंचावरून खाली जात असलेल्या रिक्षावर आणि कारवर कोसळला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२:२० च्या सुमारास मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील ‘राज्व’ (मिलन) परिसरात पियर क्रमांक P-196 जवळ हे बांधकाम सुरू होते. ऐन वर्दळीच्या वेळी सिमेंटचा मोठा तुकडा कोसळल्याने रिक्षेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुंबई अग्निशमन दल, पोलीस, मेट्रो प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
मुंबईच्या महापौर माननीय रितू तावडे यांनी मान्य केलंय की, मुलुंड मेट्रो दुर्घटना ही निष्काळजीपणामुळे घडली. महापौर महोदयांनी संवेदनशीलपणे केलेले हे प्राथमिक विश्लेषण नक्कीच स्वागतार्ह आहे. पण, महापौर महोदयांनी आणि महायुती सरकारने मुंबईकरांना पडलेल्या ‘या’ प्रश्नांचाही तातडीने… pic.twitter.com/R3Sjx31z9A
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवर खोल दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO) सांगण्यात आले आहे. तसेच, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुंबईतील मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 14, 2026
विरोधक आक्रमक: आदित्य ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांची टीका
या घटनेनंतर विरोधकांनी सरकार आणि एमएमआरडीए (MMRDA) प्रशासनाला धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “भाजपच्या राजवटीत सामान्य माणसाच्या जीवाची किंमत उरलेली नाही. काम पूर्ण होण्यापूर्वीच खांब रंगवण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत, पण सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधित कंत्राटदाराला सरकार काळ्या यादीत टाकणार का?” असा सवाल त्यांनी ‘X’ वरून केला.
मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पापाचा जीव जाणे, हा अपघात नसून प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेली हत्या आहे. कंत्राटदारांच्या कमिशनखोरीसाठी मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? आता केवळ चौकशीचे फार्स नकोत; जबाबदार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झालीच… pic.twitter.com/SGWep9yhYI
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 14, 2026
काॅंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, “मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? फक्त इन्फ्रा मॅन म्हणून मार्केटिंग करायचे, पण सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? या मृत्यूची जबाबदारी प्रशासन घेणार का?” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर –
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मेट्रोचे काम सुरू असताना या ठिकाणी आवश्यक बॅरिकेडिंग किंवा सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. वर्दळीच्या रस्त्यावर अशा प्रकारचे अवजड काम सुरू असताना पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळेच हा निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याचा आरोप होत आहे. सध्या पोलीस आणि प्रशासन या अपघाताच्या तांत्रिक कारणांचा तपास करत आहेत.





