Todays Top 10 News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर; झाडाला धडकल्याने दुर्घटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल डीजीसीएने प्रसिद्ध केलाय. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना दाट धुक्यामुळे हे विमान प्रथम एका झाडाला धडकले आणि त्यानंतर जमिनीवर कोसळले. अपघातावेळी दृश्यमानता २ हजार मीटर होती, उष्णतेमुळे फ्लाईट डेटा रेकॉर्डरचे नुकसान झाले आहे. या तांत्रिक बिघाडाचा सखोल तपास करण्यासाठी आता अमेरिकन तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून, ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीची टीम भारतात येणार आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून, राज्य सरकारने बारामतीमध्ये अजित पवारांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केलीय. या दुर्घटनेच्या सीआयडी तपासासह अंतिम अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलेय. सविस्तर वृत्त – झाडाला धडक बसल्यानंतर विमान कोसळले; अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर सुनेत्रा पवारांच्या खात्यांची जबाबदारी भरणे आणि मुश्रीफांवर; अधिवेशनात स्वतः उत्तरं देणार नाहीत sunetra pawar राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडील खात्यांच्या उत्तरांबाबत मोठी अपडेट समोर आलीय. सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि राज्य उत्पादन शुल्क या तिन्ही खात्यांची उत्तरे त्या स्वतः सभागृहात देणार नाहीत. त्याऐवजी क्रीडा व अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलीय. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून, हे त्यांचे पहिलेच अधिवेशन आहे. सविस्तर वृत्त – सुनेत्रा पवारांकडे असलेल्या तिन्ही खात्यांची जबाबदारी ‘या’ दिग्गज मंत्र्यांकडे; अधिवेशनात जबाबदारीत बदल चंद्रग्रहणातही साजरी होणार होळी; 3 मार्चलाच धुलीवंदन, पंचांगकर्त्यांचा निर्वाळा यंदा ३ मार्च रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे धुलीवंदन आणि रंगपंचमीबाबत भाविकांमध्ये संभ्रम होता, मात्र पंचांगकर्ते मोहन दाते यांनी या शंकांचे निरसन केलेय. ग्रहणाचे वेध असले तरी मंगळवारी ३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे धुलीवंदन साजरे करता येईल आणि रंगही खेळता येईल. २ मार्चला प्रदोषकाळात होलिकादहन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रग्रहण भारतात केवळ सूर्यास्तानंतर अल्पकाळ दिसणार असून, त्याचा स्पर्श दिवसा असल्याने धार्मिक कृत्यांवर त्याचा परिणाम होणार नाही. ग्रहण काळात केवळ भोजनाचा निषेध असून, अशक्त आणि वृद्धांना सकाळी ११ वाजेपर्यंत आहाराची सवलत आहे. संध्याकाळी ६:४९ नंतर मोक्षस्नान करून भोजन करता येईल, असे दाते यांनी सांगितले. इराणमध्ये सत्तापालट करा; डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणच्या जनतेला आवाहन us iran war अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी व धोरणात्मक तळांवर संयुक्त हल्ले चढवल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालट होण्याची वेळ जवळ आल्याचे मोठे विधान केलेय. इराणच्या जनतेने आता सरकारची सूत्रे स्वतःच्या हातात घ्यावीत आणि विद्यमान राजवटीविरुद्ध उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. ट्रम्प यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि सुरक्षा दलांना शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करण्याचे सांगतानाच, त्यांना पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासनही दिले. इराणची अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत ट्रम्प यांनी याला ‘स्वातंत्र्याची संधी’ म्हटलेय. या लष्करी कारवाईत अमेरिकन सैनिकांची जीवितहानी होण्याची शक्यताही त्यांनी मान्य केली असून, इराणने अणुकार्यक्रमावरील वारंवार चर्चेच्या संधी नाकारल्यामुळेच हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागलेय. युद्धाचा भडका उडण्याची शक्यता; इराणचा अमेरिका-इस्रायलला ‘निर्णायक’ इशारा पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, इराणने अमेरिका व इस्रायलला गंभीर परिणामांचा इशारा दिलाय. इस्रायलने केलेल्या ताज्या हल्ल्यानंतर, “आम्ही दबावापुढे झुकणार नाही आणि शत्रूला पश्चाताप होईल असे निर्णायक उत्तर देऊ,” अशी गर्जना इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलीय. हा हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन आणि देशाच्या सार्वभौमत्वावर घाला असल्याचे इराणने म्हटलेय. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणमधील ‘दहशतवादी राजवट’ संपवण्याचा निर्धार व्यक्त केला असून अण्वस्त्रांचा धोका ओळखून ही मोहीम तीव्र केलीय. दरम्यान, या संघर्षाचे जागतिक युद्धात रूपांतर होण्याची भीती व्यक्त होतेय. भारतीय नागरिकांना सतर्कतेचा इशारा; इस्रायल-इराण युद्ध पेटले इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलने शनिवारी इराणवर भीषण हवाई हल्ले केल्याने मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडलीय. या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावासने तेथील भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची ॲडव्हायझरी जारी केली असून त्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलेय. दूतावासने भारतीयांना स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या आणि सुरक्षित निवाऱ्याच्या जवळ राहण्याच्या सूचना दिल्यात. परिस्थिती गंभीर असल्याने भारतीयांना इस्रायलमधील अनावश्यक प्रवास टाळण्यास सांगण्यात आले असून कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात दूतावासच्या २४ तास सुरू असलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेय. दरम्यान, इराणने देशात आणीबाणी घोषित केली असून सुरक्षा कारणास्तव हवाई क्षेत्र बंद केलेय, अनेक भारतीय तेथे अडकून पडले आहेत. सविस्तर वृत्त – “सावध राहा, घराबाहेर पडू नका”; इस्रायलमधील भारतीयांना दूतावासाचा इशारा अमेरिका-इराण युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढणार gold silver मध्यपूर्वेतील अमेरिका- इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता विकोपाला गेल्याने त्याचे थेट पडसाद जागतिक बाजारपेठेवर उमटताना दिसतील. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार आपला मोर्चा सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळवतील. या भूराजकीय अस्थिरतेमुळे आगामी काळात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख ७० हजार रुपयांपर्यंत, तर चांदीचा भाव प्रति किलो ३ लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमोडिटी तज्ज्ञांनी वर्तवलीय. जानेवारीअखेर झालेल्या घसरणीनंतर आता २ मार्चपासून बाजार उघडताच मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी तेजी येण्याचे संकेत आहेत. या युद्धाचा परिणाम केवळ धातूंवरच नाही, तर होर्मुजची सामुद्रधुनी विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर आणि इतर शेतीमालाच्या किमतींवरही होणार असून, सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी नवीन नियम; 1 मार्चपासून ‘सिम बाइंडिंग’ अनिवार्य सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सॲप वापराबाबत अत्यंत कठोर पाऊल उचललेय. दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार, १ मार्च २०२६ पासून देशात ‘सिम बाइंडिंग’ प्रक्रिया अनिवार्य होणार आहे. या नवीन प्रणालीनुसार, ज्या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सॲप खाते आहे, ते सिम कार्ड संबंधित फोनमध्ये असणे बंधनकारक असेल. आतापर्यंत एकदा ओटीपी मिळाल्यावर सिम कार्ड काढूनही व्हॉट्सॲप वापरता येत होते, मात्र आता दर सहा तासांनी ॲपद्वारे सिमची पडताळणी केली जाईल. फोनमध्ये सिम नसल्यास खाते आपोआप बंद होईल. परदेशातून भारतीय क्रमांकावर चालवल्या जाणाऱ्या गुन्हेगारी कारवायांना रोखण्यासाठी सरकारने ही कडक अंमलबजावणी केली असून २८ फेब्रुवारीनंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. थलपथी विजयच्या संसारात मिठाचा खडा; त्रिशासोबतच्या अफेअरच्या चर्चांनी तमिळनाडूमध्ये खळबळ vijay and trisha तमिळ सुपरस्टार आणि राजकीय नेते थलपथी विजय सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. विजयची पत्नी संगीता यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्यात. या याचिकेत संगीता यांनी विजयवर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप केले असून, एका अभिनेत्रीसोबतच्या जवळीकीमुळे कौटुंबिक कलह निर्माण झाल्याचे म्हटलेय. या बातमीमुळे सोशल मीडियावर अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिचे नाव चर्चेत आले असून, दोघांच्या जुन्या फोटोंवरून नेटकऱ्यांनी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केलीय. विशेषतः जून २०२४ मध्ये त्रिशाने विजयसोबत शेअर केलेली सेल्फी आणि गोव्यातील एका खासगी विमानतळावरील त्यांचे कथित फोटो या अफवांना खतपाणी घालत आहेत. विजय यांनी नुकताच स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला असून २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असतानाच या वादाने त्यांच्या प्रतिमेसमोर प्रश्नचिन्ह उभे केलेय. अद्याप विजय किंवा त्रिशा यांपैकी कोणीही यावर अधिकृत भाष्य केलेले नाही, मात्र या घटस्फोटाच्या वृत्ताने तमिळ चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. 67 वर्षांनंतर जम्मू-काश्मीर पहिल्यांदाच बनला ‘रणजी चॅम्पियन’ भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये जम्मू-काश्मीरने नवा इतिहास रचलाय. रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात बलाढ्य कर्नाटक संघाला नमवून जम्मू-काश्मीरने पहिल्यांदाच विजेतेपदावर आपले नाव कोरलेय. १९५९ पासून सुरू झालेली ६७ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपलीय. या विजयाचा खरा नायक ठरला वेगवान गोलंदाज आकिब नबी, ज्याने या हंगामात सर्वाधिक ६० विकेट्स घेतले. जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात ५८४ धावांचा डोंगर उभा केला होता, प्रत्युत्तरात कर्नाटकचा डाव २९३ धावांत आटोपला. पहिल्या डावातील २९१ धावांच्या निर्णायक आघाडीच्या जोरावर जम्मू-काश्मीरला विजेता घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मैदानात उपस्थित राहून खेळाडूंचे अभिनंदन केले. सविस्तर वृत्त – जम्मू काश्मीची ६७ वर्षांची प्रतीक्षा संपली; कर्नाटकला नमवून पहिल्यांदाच कोरलं रणजी ट्रॉफीवर नाव