Todays Top 10 News: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर ते 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट… वाचा आजच्या टाॅप बातम्या
Todays Top 10 News: इराण युद्धात भारतीय अडकले, महाराष्ट्र सरकार सरसावले; वेतन आयोगात मोठ्या मागण्या, राज्यसभा यादीत महाराष्ट्राचा सस्पेन्स कायम. वाचा आजच्या टाॅप बातम्या.

Todays Top 10 News: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राचा सस्पेन्स कायम
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी देण्यात आलीय. १० राज्यांतील ३७ जागांसाठी ही प्रक्रिया सुरू असून भाजपने बिहारमध्ये नितीन यांच्यासह शिवेश कुमार, आसाममध्ये तेराश गोवाला, जोगेन मोहन, छत्तीसगडमध्ये लक्ष्मी वर्मा हरियाणातून संजय भाटिया, ओडिशात मनमोहन सामल, सुजीत कुमार तर पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा यांची नावे निश्चित केली आहेत.
मात्र, सर्वाधिक ७ जागा असलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा अद्याप प्रलंबित असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढलीय. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, विजया रहाटकर, मिलिंद कांबळे, कुणाल पाटील, भारती पवार, दिलीप कांबळे, माधव भंडारी, अमर साबळे, प्रीतम मुंडे, यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप राज्यात ३ जागा सहज जिंकू शकते, तर चौथ्या जागेसाठी त्यांना मित्रपक्षांच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे.
सविस्तर वृत्त – भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाचं काय?
मराठी नागरिकांच्या सुटकेसाठी राज्य सरकार सरसावले; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे विशेष प्रयत्न
इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकार आणि विविध यंत्रणांच्या संपर्कात असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवलीय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून स्टार एअरची दोन विमाने आज १६४ प्रवाशांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत, ज्यात पुण्यातील ८४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी करत नागरिकांच्या सुरक्षिततेची ग्वाही दिलीय. सरकारने मदतीसाठी +97150 365 4357 हा व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला असून, अडकलेल्या प्रत्येक मराठी माणसाला सुखरूप परत आणण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
कांदा दरात मोठी घसरण; शेतकरी संकटात; 1500 रुपये अनुदानासाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला असून, कांद्याचे दर प्रति किलो ८ ते १० रुपयांपर्यंत खाली आल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झालेय. या घसरत्या दरांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाशिकमधील विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा तीव्र निषेध केला.
गेल्या दोन महिन्यांत दरात ८०० रुपयांची घसरण झाली असून, लेट खरीप कांद्याची आवक वाढल्याने बाजारभाव कोसळलेत. अवकाळी पाऊस आणि महागड्या बियाणांमुळे आधीच आर्थिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी आता प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान आणि समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी केलीय. शासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
खामेनींच्या हत्येवर भारताचे मौन म्हणजे जबाबदारीतून पळ; सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर भारत सरकारने स्वीकारलेल्या भूमिकेवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढलेत. एका प्रसिद्ध वृत्तपत्रातील लेखात त्यांनी म्हटले आहे की, राजनैतिक चर्चा सुरू असताना झालेली ही हत्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून, भारताचे मौन ही तटस्थता नसून जबाबदारीपासून पळ काढणे आहे.
पंतप्रधान मोदींनी इस्रायल दौऱ्यावरून परतल्यावर केवळ इराणच्या प्रत्युत्तराचा निषेध केला, मात्र इराणच्या सार्वभौमत्वावरील हल्ल्याकडे दुर्लक्ष केले. सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर संसदेत खुल्या चर्चेची मागणी केली असून, अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय कायदे कमकुवत होऊन भारताच्या धोरणात्मक हितांना बाधा पोहोचू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
इराण-अमेरिका युद्ध भडकले; इस्रायली हल्ल्यात 787 ठार
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात आतापर्यंत ७८७ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १६५ शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र झालाय.
याला प्रत्युत्तर म्हणून इराणने दुबई, दोहा आणि रियाधसह खाडी देशांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवलेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत इराणचे अणू आणि क्षेपणास्त्र तळ नष्ट करेपर्यंत ही कारवाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय. या युद्धात आतापर्यंत ६ अमेरिकन सैनिकही मारले गेले असून, या संकटामुळे आखाती देशांत राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
पंतप्रधान मोदींचा ओमान आणि कुवेतच्या प्रमुखांशी संवाद; पश्चिम आशियातील युद्धाचा भडका
पश्चिम आशियातील इराण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ओमानचे सुल्तान हैथम बिन तारिक आणि कुवेतचे क्राउन प्रिंस शेख सबा अल-खालिद यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या भागात सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत आणि वाढत्या तणावाबाबत पंतप्रधानांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
यापूर्वी त्यांनी सौदी अरब, बहरीन आणि यूएईच्या नेत्यांशीही संवाद साधून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. आखाती देशांमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांची सुखरूप घरवापसी हा भारताचा मुख्य प्राधान्यक्रम असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. कोणत्याही वादाचे निराकरण केवळ मुत्सद्देगिरी आणि संवादातूनच व्हायला हवे, असे आवाहन करत भारत सातत्याने शांततेसाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वैद्यकीय भत्ता 1 हजारावरून थेट 20 हजार; 8 व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग
केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आला असून कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्यांचे ‘युनिफाइड चार्टर’ तयार केलेय. यामध्ये प्रामुख्याने फिक्स्ड मेडिकल अलाउंस (FMA) १,००० रुपयांवरून थेट २०,००० रुपये करण्याची मागणी करण्यात आलीय. वाढत्या उपचारांच्या खर्चाचा विचार करता, जिथे सीजीएचएस सुविधा नाही अशा भागातील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
यासोबतच ३.२५ फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून ७ टक्के करणे आणि किमान वेतन निश्चितीसाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या ३ ऐवजी ५ गृहीत धरण्याची मागणी लावून धरलीय. जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्यासह ५० टक्के महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याबाबत कर्मचारी आक्रमक आहेत.
रणबीर-कतरिनाने लुटला रंगांचा आनंद; शबाना-जावेद यांची जंगी पार्टी
होळीनिमित्त संपूर्ण बॉलिवूड रंगांत न्हाऊन निघाले असून मुंबईत ठिकठिकाणी सेलिब्रिटींनी जल्लोष साजरा केला. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, जिथे उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा आणि मनीष मल्होत्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.
विशेषतः कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची ही होळी त्यांचा मुलगा विहानच्या जन्मानंतरची पहिलीच असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. रणबीर कपूर, रणदीप हुडा आणि वरुण धवन यांनीही सोशल मीडियावरून चाहत्यांना शुभेच्छा देत होळीचे खास फोटो शेअर केलेत. टीव्ही क्षेत्रातील कलाकारांनीही विविध संगीत सोहळ्यांमध्ये सहभागी होत या रंगोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
खेळाडूंना बळीचा बकरा बनवू नका; मोहम्मद आमिरचा पीसीबीला कडक इशारा
टी-२० वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) प्रत्येक खेळाडूवर ५० लाख रुपयांचा दंड ठोठावल्याने नवा वाद पेटलाय. या निर्णयावर माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने कडक शब्दांत टीका करत बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना इशारा दिलाय. खेळाडू स्वतःची निवड स्वतः करत नाहीत, त्यामुळे केवळ त्यांनाच दोषी धरण्याऐवजी निवडकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दुप्पट दंड लावायला हवा, असे आमिरने म्हटलेय.
खेळाडूंना वारंवार ‘बळीचा बकरा’ बनवणे थांबवा आणि केवळ दंड न आकारता खराब कामगिरी करणाऱ्यांना संघातून बाहेर काढून देशांतर्गत क्रिकेट खेळायला पाठवा, असा सल्लाही त्याने दिला. भारताकडून झालेल्या पराभवानंतर पीसीबीने ही दंडात्मक कारवाई जाहीर केल्याने सध्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय.
सोलापुरात रंगणार महिला महाराष्ट्र केसरीचा थरार; 28 मार्चपासून 400 हून अधिक महिला कुस्तीगीर भिडणार
सोलापूरच्या ऐतिहासिक भूमीत २८ आणि २९ मार्च रोजी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. निर्झरा केअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांतील ४०० हून अधिक महिला खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. या स्पर्धेत तीनवेळा विजेतेपद मिळवलेली भाग्यश्री फंड प्रमुख दावेदार असून तिच्यासमोर अमृता पुजारी आणि प्रगती गायकवाड यांचे कडवे आव्हान असेल.
हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत १० विविध वजनी गटांत लढती होतील. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या आयोजनाची माहिती दिली. महिला कुस्तीगीरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या महिला कुस्तीगीराला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.










