Todays Top 10 News: महाराष्ट्राच्या खासदारासह अनेकजण दुबईत अडकले ते भारतात हायअलर्ट… वाचा आजच्या टाॅप बातम्या
Todays Top 10 News: आखाती देशांत युद्ध पेटल्याने खासदार काळेंसह ५० हजार महाराष्ट्रीय पर्यटक अडकले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतावर इंधन संकट ओढावले असून शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. केंद्र सरकार सतर्क आहे.

Todays Top 10 News: खासदार काळेंसह महाराष्ट्रातील हजारो पर्यटक दुबईत अडकले; आखाती देशांत युद्धाचा भडका
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका परदेशातील भारतीयांना बसला असून जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकलेत. आखाती देशांतील विमान सेवा अचानक बंद झाल्याने खासदार काळे यांच्यासह जालन्यातील इतर सात नागरिकही तिथे अडकल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.
डॉ. काळे सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली असून, विमान उड्डाणे पूर्ववत होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत. दुसरीकडे, उमराह यात्रेसाठी मक्का-मदीना येथे गेलेले महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार यात्रेकरू देखील या संकटामुळे आखाती देशांमध्ये अडकून पडलेत. एकट्या नागपूरमधील २२०० यात्रेकरूंचा यात समावेश असून, त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोग आणि सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सविस्तर वृत्त – महाराष्ट्रातील ‘हे’ खासदार अडकले इराण-इस्रायल युद्धात; महत्त्वाची माहिती समोर
संबंधित वृत्त – दुबईमध्ये माजी नगरसेविकेसह पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; कुटुंबियांकडून चिंता व्यक्त
भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सज्ज; पंतप्रधान मोदींचे मदतीचे निर्देश
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील भारतीयांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त केली. सोमवारी पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, भारत सर्व वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याच्या बाजूने आहे. या संकटकाळात आखाती देशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, पंतप्रधान मोदींनी सर्व संबंधित विभागांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिलेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारची तयारी अधोरेखित करताना सांगितले की, परदेशातील भारतीय दूतावास सातत्याने तेथील नागरिकांच्या संपर्कात आहेत. विशेषतः इराणमधील हवाई हल्ले आणि दुबईवरील ड्रोन हल्ल्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, भारतीयांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन सरकारने केलेय. युक्रेन युद्धाप्रमाणेच याही वेळी प्रत्येक भारतीयाला मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.
खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीनगरमध्ये निदर्शने; पोलिसांचा अश्रुधुराचा वापर
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी श्रीनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. बेमिना महाविद्यालयाजवळ निदर्शकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण खोऱ्यात कडक निर्बंध लागू केले असून मोबाईल इंटरनेटचा वेगही कमी केलाय.
लाल चौक आणि विमानतळ रस्ता यांसारख्या संवेदनशील भागांत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दले तैनात करण्यात आली असून रस्ते काटेरी तारांनी बंद करण्यात आलेत. धार्मिक संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद होत्या. नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी यांनी या निर्बंधांचा निषेध करत प्रशासनावर टीका केली आहे, तर धार्मिक नेत्यांनी या हत्येला अमेरिका आणि इस्रायलची आक्रमकता असल्याचे म्हटलेय.
खामेनी यांच्या निधनानंतर भारतात हायअलर्ट; दूतावास आणि संवेदनशील स्थळांच्या सुरक्षेत वाढ
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर देशातील विविध शहरांत होणारी निदर्शने पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे पडसाद भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर पडू नयेत, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. गृह मंत्रालयाने प्रामुख्याने इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या दूतावास कार्यालयांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले असून, पर्यटन स्थळे आणि ज्यू संस्थांवर विशेष नजर ठेवण्यास सांगितलेय.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, इसिस आणि अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटना सध्याच्या तणावाचा फायदा घेऊन अशांतता पसरवू शकतात. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी सखोल तपासणी करावी आणि सोशल मीडियावरील प्रक्षोभक संदेशांवर कडक नियंत्रण ठेवावे, असे स्पष्ट करण्यात आलेय. सर्व राज्यांच्या पोलीस महासंचालकांना ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ सज्ज ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद; भारतासह जगावर इंधन टंचाईचे सावट
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शिगेला पोहोचले असून इराणने जगातील अत्यंत महत्त्वाचा तेल निर्यात मार्ग ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद करण्याची घोषणा केलीय. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेरिकन तळांवर हल्ले चढवले असून आता या सागरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय.
१ मार्च रोजी या मार्गावरून भारताकडे जाणारा एकही तेल टँकर रवाना झाला नसल्याचे समोर आलेय. या संकटामुळे भारताची चिंता वाढली असून देशाची ५० टक्के कच्च्या तेलाची आणि बहुतांश एलपीजीची पुरवठा साखळी धोक्यात आलीय. तज्ज्ञांच्या मते, हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्यास जागतिक स्तरावर तेलाच्या किमती भडकतील आणि मालवाहतुकीचा खर्चही वाढेल. सध्या अनेक जहाजांनी आपले मार्ग बदलले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ती सुरक्षित बंदरांवर थांबली आहेत, ज्यामुळे आगामी काळात ऊर्जा संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; गुंतवणूदारांचे 6.5 लाख कोटी रुपये बुडाले
भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी पडझड पाहायला मिळाली असून सेन्सेक्स १०४८ अंकांनी कोसळला. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव तसेच कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १.२९ टक्क्यांनी घसरून ८०,२३८ वर, तर निफ्टी ३१३ अंकांनी घसरून २४,८६५ च्या पातळीवर बंद झाला.
या मोठ्या घसरणीमुळे बीएसईमधील कंपन्यांचे बाजार भांडवल घटल्याने गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात सुमारे साडेसहा लाख कोटी रुपये बुडाले. प्रामुख्याने सन फार्मा, भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे, संरक्षण क्षेत्रातील काही शेअर्सनी मात्र तेजी राखली.
EPFO कडून 8.25% व्याजदर कायम; 7 कोटी सभासदांना लवकरच मिळणार लाभ
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी व्याजाचा दर ८.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे देशातील सात कोटींहून अधिक नोकरदारांना दिलासा मिळालाय.
आता या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर व्याजाची रक्कम थेट सभासदांच्या खात्यात जमा केली जाईल. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी संघटनेने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. पीएफवरील व्याजाची गणना दरमहा केली जात असली, तरी आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती एकत्रितपणे खात्यात जमा होते.
सविस्तर वृत्त – व्याजदर 8.25% कायम; 7 कोटी खातेधारकांना पैसे कधी मिळणार? जाणून घ्या
इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; नेतन्याहू यांच्या कार्यालयाला लक्ष्य केल्याचा दावा
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर थेट क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा खळबळजनक दावा केलाय. ‘ऑपरेशन ट्रुथ प्रॉमिस ४’ अंतर्गत हा हल्ला करण्यात आला असून यामध्ये इस्रायली हवाई दल प्रमुखांच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आलेय.
इराणने नेतन्याहू यांचा उल्लेख ‘गुन्हेगारी पंतप्रधान’ असा केला असून इस्रायलच्या लष्करी कारवायांचा हा बदला असल्याचे स्पष्ट केलेय. या हल्ल्यात इस्रायलच्या सरकारी संकुलांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा इराणने केला असला तरी, इस्रायलने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दोन्ही देशांमधील वाढत्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धाचा धोका अधिक गडद झालाय.
जावेद अख्तर यांची ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यावर टीका; इराणवरील हल्ल्याचा केला निषेध
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. २ मार्च रोजी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया देताना अख्तर यांनी या दोन्ही नेत्यांना ‘बदमाश’ संबोधले असून त्यांच्या आक्रमक धोरणामुळे जागतिक शांतता धोक्यात आल्याचे म्हटलेय.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण लष्करी हल्ल्यात एका शाळेसह मोठ्या प्रमाणावर नागरी नुकसान झालेय. या संघर्षाचे पडसाद आता दुबई, कतार आणि कुवेतपर्यंत उमटत असून अख्तर यांनी या परिस्थितीबद्दल तीव्र संवेदनशीलता व्यक्त केलीय. त्यांनी इशारा दिला की, जर हे हल्ले थांबले नाहीत तर जागतिक महासत्तांची विश्वासार्हता पूर्णपणे संपुष्टात येईल.
विजयानंतर संजू सॅमसन भावूक; रोहित-विराटला दिले यशाचे श्रेय
वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवल्यानंतर संजू सॅमसन अत्यंत भावूक झाला. सामनावीर पुरस्कार स्वीकारताना तो म्हणाला, “मी ज्या दिवसापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून या क्षणाची वाट पाहत होतो. माझा प्रवास चढ-उतारांचा होता, अनेकदा स्वतःवर शंकाही आली, पण विश्वास कायम ठेवला”.
या यशाचे श्रेय दिग्गज खेळाडूंना देताना संजूने नमूद केले की, डगआऊटमध्ये बसून त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून खेळाचे बारकावे आणि दडपणाखाली सामना संपवण्याचे कौशल्य शिकले. प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून भारताला विजय मिळवून दिल्याने संजूने या दिवसाला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस म्हटलेय.









