India-bangladesh relations: भारतासोबतचे संबंध कसे असतील? बांगलादेशच्या भावी पंतप्रधानांचे एकाच वाक्यात खळबळजनक उत्तर
India-bangladesh relations: २९९ पैकी २१२ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवून २० वर्षांनंतर सत्तेत परतलेल्या तारिक रहमान यांनी यावेळी सुशासनाचे (गुड गव्हर्नन्स) आश्वासन दिले. मात्र, भारत-बांगलादेश संबंधांच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत एका ओळीत उत्तर दिले.

Tarique Rahman: बांगलादेश नॅशनल पार्टीचे (BNP) अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी आपली पहिली अधिकृत पत्रकार परिषद घेतली. २९९ पैकी २१२ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवून २० वर्षांनंतर सत्तेत परतलेल्या तारिक रहमान यांनी यावेळी सुशासनाचे (गुड गव्हर्नन्स) आश्वासन दिले. मात्र, भारत-बांगलादेश संबंधांच्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत एका ओळीत उत्तर दिले.
‘आमच्यासाठी बांगलादेश आणि जनताच प्रथम’ –
पत्रकार परिषदेत जेव्हा तारिक रहमान यांना विचारण्यात आले की, “तुम्ही भारतासोबतचे संबंध कसे पुढे नेणार?” तेव्हा त्यांनी थेट उत्तर टाळत म्हटले, “आमच्यासाठी बांगलादेश आणि बांगलादेशची जनता प्रथम आहे. त्यामुळे देश आणि येथील जनतेसाठी जे सर्वोत्तम असेल, त्यानुसारच आमचे परराष्ट्र धोरण ठरेल.”
भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्यातील संबंधांचा समतोल कसा राखणार, या प्रश्नावरही त्यांनी फारसे भाष्य केले नाही. ‘या प्रश्नाचे उत्तर आधीच दिले आहे’, असे सांगून त्यांनी हा विषय निकालात काढला.
शेख हसीना यांचे प्रत्यर्पण कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून –
२०२४ मधील जनआंदोलनानंतर शेख हसीना सध्या भारतात आहेत. आंदोलकांनी त्यांच्या फाशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर “तुम्ही भारताकडे त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करणार का?” असे विचारले असता रहमान यांनी उत्तर दिले. “हा सर्व प्रकार कायदेशीर प्रक्रियेवर (Legal Process) अवलंबून असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
चीनसोबतच्या संबंधांवर सकारात्मक भूमिका –
चीनबद्दल बोलताना रहमान म्हणाले की, “चीन आधीच बांगलादेशातील अनेक विकास प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. भविष्यात आम्ही त्यांच्यासोबत अधिक चांगल्या प्रकारे काम करू, अशी आम्हाला आशा आहे.” ढाका येथील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि आर्थिक स्थिती सुधारणे हे आपल्या सरकारपुढील मुख्य आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
३६ वर्षांनंतर बांगलादेशला पुरुष पंतप्रधान मिळणार –
दरम्यान, बांगलादेशात ऐतिहासिक बदल घडत आहेत. तब्बल ३६ वर्षांनंतर बांगलादेशला पुरुष पंतप्रधान मिळणार आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून खालिदा झिया आणि शेख हसीना यांच्याकडेच सत्तेची सूत्रे होती. २९९ जागांच्या संसदेत BNP ला २१२ जागा मिळाल्या आहेत, तर मित्रपक्ष जमात-ए-इस्लामी युतीला ७६ जागा मिळाल्या आहेत. शेख हसीना यांच्या आवामी लीगवर निवडणूक लढवण्यास बंदी असल्याने त्यांनी या प्रक्रियेत भाग घेतला नव्हता.





