शिक्रापूर -हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील बेपत्ता 55 वर्षीय महिलेचा खून करून महिलेचा मृतदेह पोत्यामध्ये भरून तो एका विहिरीमध्ये फेकून दिला होता. ही घटना सोमवारी (दि. 1) उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया उर्फ शारदा पोपट सकट (वय 55 रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रामदास पोपट सकट (रा. माळवाडी कासुर्डी ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही महिला दि. 29 मे रोजी झाडू विकण्यासाठी गेलेली असताना पुन्हा घरी आलीच नाही त्यामुळे तिच्या नातेवाइकांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, म्हणून शिक्रापूर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
शिक्रापूर पोलीस शोध घेताना वरुडे हद्दीतील विहिरीमध्ये फुगलेले पोते आणि त्या पोत्याचा वास येत असल्याचे नागरिकांना दिसले. काही नागरिकांनी विहिरीमधील ते पोते पाण्याबाहेर काढून पाहिले असता त्या पोत्यामध्ये बेपत्ता महिलेचा मृतदेह असल्याचे दिसून आले.
दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक निरीक्षक मयूर वैरागकर, विक्रम साळुंके, सहायक उपनिरीक्षक महेंद्र शिंदे आदींनी घटनास्थळी पाहणी केली.
महिलेचा खून कोणत्या कारणातून झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही, मात्र खून करून मृतदेह पोत्यात बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून विहिरीमध्ये फेकून दिल्याचे समोर आले आहे.