भाजपाच्या महिला पदाधिाकाऱ्याने धमकावले, शबरीमलाला जाणारच : भूमाता ब्रिगेड ठाम
थिरूवनंतपूरम : तृप्ती देसाई, तुम्ही कल्पना करू शकणार नाही! काय परिणाम होतील त्याची… सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी जाण्याचा निर्णय घेणाऱ्या तृप्ती देसाई यांना ही धमकी दिली आहे भाजपाच्या प्रदेश सचिव अंजना यांनी.
जर तृप्ती यांना शबरीमलात यायचं असेल तर काय घडू शकतं, याची कल्पना त्या करू शकणार नाहीत. श्रध्दाळू भाविक काय करतील याचा नेम नाही… आम्ही सारे त्यांचा विरोध करू, असे अंजना एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या. शबरीमलावर श्रध्दा ठेवणाऱ्या प्रत्येकाने सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. काही जण आमच्या श्रध्दा आणि परंपरांच्या विरोधात आहेत.शबरीमला हे यात्रेचे केंद्र बनवण्याऐवजी काही जणांना ते पैसे कमवायचे ठिकाण बनवायचे आहे. ते काही तरी करतात पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, मंदिरतात जाण्यापासून महिलांना रोखण्याच्या निर्णयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. मला सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही तरी मी 20 तारखेनंतर मंदिरात दर्शनासाठी जाणारच, असा निर्धार देसाई यांनी व्यक्त केला आहे. डोंगरावरील मंदिरापासून सहा किलोमिटर अंतरावर असणाऱ्या पांभा या तळावरून 10 ते 50 वयोगटातील 10 महिलांना शनिवारी दिवसभरात परत पाठवण्यात आले. वार्षिक मंडल पूजेसाठी शबरीमलात भाविकांचा सागर उसळला असून तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या मंदिरात रजस्वला स्त्रियांना प्रवेश दिला न जाण्याची परंपरा आहे. त्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायलयाने समानतेच्या निकषावर या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा आणि त्या महिलां भाविकांना संरक्षण देण्याचा निर्णय दिला होता. त्यावर सात जणांच्या खंडपीठाकडे समानतेच्या मुद्द्यावरील धार्मिक प्रवेशाची प्रकरणे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने 3:2 असा विभाजित निकाल दिला होता. मात्र त्यात आधीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली नाही. त्यामुळे याबाबत संदिग्धता आहे. कम्युनिस्ट पक्षाने याबाबत सावध भूमिका स्वीकारली आहे.