अमरावती – महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा सासरवाशिन महिलांना सासरच्या मंडळीकडून त्रास देण्यात येतो. कधी तर त्यांना मारहाण करण्यात येते. हुंड्यासाठी अशा घटना अनेक ठिकाणी घडतात. मात्र विदर्भातील अमरावती येथून विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका घरजावयाने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.
वनोजा बाग तालुक्यातील कापूताळणी येथील ही घटना आङे. घरजावयाने पत्नी आणि सासू-सासऱ्याच्या जाचाला कंटाळून अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले होते. जावयावर १० दिवस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विकास राजेश इंगळे (२३, रा. सातेगाव) असे मृत जावयाचे नाव आहे.
विकासने २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५:३० च्या सुमारास सासरी स्वत:ला जाळून घेतले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. मात्र २ डिसेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. विकासला आई-वडील नाही. त्याचे पालनपोषण सातेगाव येथे आजी-आजोबांनी केले आहे. मात्र लग्न झाल्यानंतर विकास पत्नीच्या गावी घरजावई म्हणून तो राहत होता.
दरम्यान विकास आजी-आजोबांना भेटायला सातेगावला जात होता. मात्र पत्नी व सासू-सासरे सातेगावला जाण्यास त्याला मनाई करत होते. त्यावरून त्याला अनेकदा मारहाणही करण्यात आली. याच जाचाला कंटाळून विकासने आत्महत्येचे पाऊल उचलले, असं विकासची आजी इंदुबाई समाधान इंगळे (६०, रा. सातेगाव) यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आरती (२१), सासरे प्रमोद महादेव वानखडे (४५) व सासू वंदना (४५, सर्व रा. कापूसतळणी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०७, ३०६, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला.