मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुसंख्य आमदार अजित पवार गटात सामील झाले. अजित पवार गटाकडे नेमका आकडा किती आहे? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटातील काही नेत्यांकडून विविध बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो लावला जात आहे.
याबाबत न्यायालयात जाणार असल्याचा इशारा खुद्द शरद पवारांनी दिलेला आहे. तरीही काही आमदारांकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे (शरद गट) आमदार रोहित पवार यांनी अल्टिमेटम दिला आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटाकडून फोटो वापरण्याबाबत शरद पवारांनी वक्तव्य केले आहे. ज्या ठिकाणी अजित पवार गटाच्या मोठ्या सभा होतात, तिथून त्यांनी शरद पवारांचा फोटो वापरणे बंद केले आहे. पण आमदारांना माहीत आहे, शरद पवारांशिवाय लोक आपल्याला मतदान करणार नाहीत.
त्यामुळे त्या-त्या आमदारांकडून स्थानिक स्तरावर फोटो लावला असावा. ज्यांना पदे मिळाली, ज्यांना मंत्रिपदे मिळाली, जे आज सत्तेत आहेत, ते कदाचित शरद पवारांना विसरले असतील. पण अनेक आमदार अजून शरद पवारांना विसरले नाहीत. अजूनही वेळ गेली नाही, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
एकच अध्यक्ष ते म्हणजे शरद पवार
रोहित पुढे म्हणाले, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकच अध्यक्ष आहेत, ते म्हणजे शरद पवार. आता अजित पवार गटाला निवडणूक आयोगाबाबत आत्मविश्वास आहे, त्यांना वाटते की निवडणूक आयोग त्यांच्या खिशात आहे, ते बरोबरच आहे.
निवडणूक आयोग त्यांच्या बाजुने निर्णयही देईल. पण सर्वोच्च न्यायालय अजूनही न्यायाच्या बाजुने म्हणजेच आमच्या बाजुने आहे. आमचा लढा मोठा आहे.
आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह असले काय आणि नसले काय? आमच्याकडे पवारसाहेब आहेत. शरद पवारांच्या हिंमतीवर, लोकांच्या ताकदीवर आणि लोकांना विश्वासात घेऊन आम्ही आमचा लढा लढू.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या नेत्यांचा अहंकार आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.